आजपासून देशभरात निधी समर्पण अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 16:44 IST2021-01-14T16:43:59+5:302021-01-14T16:44:26+5:30
जिल्हाभरात विविध उपक्रम; रॅली, सभा, भक्तीफेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

आजपासून देशभरात निधी समर्पण अभियान
भुसावळ : अयोध्या येथे श्रीराम जन्मभूमीवर लवकरच राममंदिराचे भव्य असे निर्माण होणार आहे. त्या निर्माण कार्यासाठी हातभार लागावा यासाठी विश्व हिंदू परिषदतर्फे संपूर्ण देशभरात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान श्रीराम मंदीर समर्पण निधी अभियान राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. विविध स्तरावर बैठका घेण्यात येत आहे. संघकार्याच्या दृष्टीने भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, वरणगाव, शेंदुर्णी, जामनेर असे एकूण आठ तालुके (प्रखंड) आहेत. अभियानासाठी प्रत्येक तालुका स्तरावर समितींची स्थापन करण्यात आली आहे.
अभियान राबविण्यासाठी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील संत महंताची समिती स्थापन करण्यात आली आहे. यातील संत महंत महिन्याभरात आठही प्रखंडात शुक्रवारपासून राम मंदिर निधी समर्पण अभियानासाठी विविध व्याख्याने, कीर्तन करणार आहेत. आठही प्रखंडात तालुका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्याभरात रॅली, रामधून दिंडी अशा प्रकारच्या विविध उपक्रमांत जनसंपर्क करुन निधी जमा करण्यात येणार आहे.