अखेर शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या विद्युत खांब हटवण्यासाठी निधीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:21 AM2021-08-28T04:21:46+5:302021-08-28T04:21:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामातील प्रमुख अडथळा ठरलेले विद्युत पाेल शिफ्टींगच्या कामासाठी निधी खर्चाचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामातील प्रमुख अडथळा ठरलेले विद्युत पाेल शिफ्टींगच्या कामासाठी निधी खर्चाचा निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने शुक्रवारी ४ कोटी १६ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, विद्युत खांब स्थलांतर करण्याच्या कामाला लवकरच सुरुवात करून महिनाभरात हा प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लोकमतला दिली.
विद्युत खांब हटवण्यासोबतच २५ काेटीतून शिल्लक असलेल्या ४ काेटी १६ लाख रूपयांतून निश्चित केलेल्या इतर सात कामांना देखील मंजुरी मिळाली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील मुलभूत सोई सुविधांच्या विकास करण्यासाठी २०१६-१७ या आर्थिक वर्षात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ काेटींचा निधी मंजुर केला हाेता. त्यातील कामे पुर्ण झाल्यानंतर ४ काेटी १६ लाख रूपयांचा निधी शिल्लक राहिला हाेता. या शिल्लक निधीतून सात कामे करण्याचा ठराव महासभेत मंजुर करण्यात आला हाेता. या कामांना पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने देखील मंजुरी दिली हाेती. दरम्यान विभागीय आयुक्तांनी या कामांना मंजुरी देण्यास असमर्थता दाखवल्याने गेल्या महिन्यात २७ जुलै राेजी महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी राज्य शासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला हाेता. या प्रस्तावाला बराेबर एका महिन्यानंतर म्हणजे २७ ऑगस्ट राेजी नगरविकास विभागाने मंजुरी दिली आहे. यामुळे शहरातील माेठी अडचण ठरलेल्या शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामातील पाेल शिफ्टिंगच्या कामातील माेठा अडथळा दूर हाेणार आहे.