आफ्रिकेत खून झालेल्या मुलाचे व्हिडीओ कॉलवरुनच घेतले अंत्यदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:14 AM2021-01-18T04:14:37+5:302021-01-18T04:14:37+5:30
जळगाव : पाळधी.ता.धरणगाव येथील मूळ रहिवासी व अफ्रिकेतील जार्डिन मेबल या कंपनीचे मालक उद्योजक सर्वेश श्रीकांत मणियार (वय ४२) ...
जळगाव : पाळधी.ता.धरणगाव येथील मूळ रहिवासी व अफ्रिकेतील जार्डिन मेबल या कंपनीचे मालक उद्योजक सर्वेश श्रीकांत मणियार (वय ४२) यांचा गुरुवारी आफ्रिकेतील तंजोम्बातो येथे त्यांच्याच कंपनीत आठ जणांनी चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली. दरम्यान, कोविड या संसर्गजन्य आजारामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असल्याने सर्वेश यांचा मृतदेह पाळधीत आणता आला नाही किंवा येथून आई, वडीलांना तेथे जाता आले नाही, त्यामुळे मोबाईलवरुनच अंत्यदर्शन घ्यावे लागले. सर्वेश यांचा मुलगा श्रीरंग व भाऊ शैलेश यांनी त्यांना अग्निडाग दिला. अंत्यसंस्कारापूर्वीची विधी व अंत्यसंस्काराच्यावेळी व्हीडीओकॉल करुन वडील श्रीकांत सिताराम मणियार व आई इंदिरा यांनी हा विधी पाहिला. मुलाचे अंत्यदर्शनही घेता न आल्याचे दु:ख आई, वडिलांच्या नशिबी आले. दरम्यान, रविवारी पाळधी येथील निवासस्थानी उठावणाचा कार्यक्रम झाला. सर्वेश यांच्या कुटुंबियांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
व्यावसायिक स्पर्धेतून हत्येचा संशय
आफ्रिकेतील मडागास्कर जिल्ह्यात जार्डिन मेबल या नावाने सर्वेश यांच्या मालकीच्या तीन कंपन्या आहेत. व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. सर्वेश हे चहा घेण्यासाठी कंपनीत गेले असता तेथे चालक व चौकीदार यांना मारहाण करुन बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर हल्लेखोरांनी मणियार यांना बाथरुममध्ये नेले. तेथे दोरीने गळा दाबून तर दुसऱ्याने पोटात चाकूने सपासप वार केले. या कृत्यात आठ जणांचा समावेश होता, चालक, चौकीदारासह चार जणांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सर्वेश यांचे वडील श्रीकांत मणियार यांनी ‘लोकमत’ ला दिली.
१० वर्षांपूर्वी सर्वेश हे अफ्रिकेतील एंटानानारिवो येथे स्थायिक झालेले आहेत. तंजोम्बातो येथे जार्डिन मेबल या फर्निचर व प्लास्टिकचे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे ते मालक आहेत. मणियार यांची इथियोपिया येथेही कंपनी आहे. औद्योगिक कामानिमित्त सर्वेश यांचे मोठे बंधू शैलेश मणियार हे इथियोपिया येथे गेलेले होते. घटनेची माहिती मिळताच ते परत आले. भाऊ शैलेश, पत्नी खुशबू, १० वर्षीय मुलगा श्रीरंग व मुलगी इशान्वी यांच्या उपस्थितीत सर्वेश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.