ममुराबादला विवाहितेचे अंत्यसंस्कार रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 12:57 PM2017-07-31T12:57:25+5:302017-07-31T12:58:24+5:30
संशयास्पद मृत्यू : आरोप-प्रत्यारोपात डॉक्टरांचा शवविच्छेदन करण्यास नकार
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 31 - तालुक्यातील ममुराबाद येथे पूजा भगवान लोहार-पवार (वय 21) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या कारणावरुन अंत्यसंस्कार रोखण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान, माहेरच्या लोकांनी केलेल्या आरोपामुळे पोलिसांनी पती, सासू, सासरा व दिर अशा चौघांना ताब्यात घेतले आहे. आरोप,प्रत्यारोपामुळे जिल्हा रुग्णालयातही डॉक्टरांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. शेवटी पूजा यांच्या आई, वडीलांची लेखी घेतल्यानंतर रात्री उशिरा शवविच्छेदन झाले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पूजा लोहार या विवाहितेला शनिवारी मध्यरात्री दीड वाजता छातीत दुखत असल्याने ह्दयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना तातडीने जळगावला दवाखान्यात हलविण्यात आले, मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. परंतु तरीही तिला खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषीत केल्यानंतर पहाटे तीन वाजता मृतदेह ममुराबादला नेण्यात आला. पूजा यांचा मृत्यू झाल्याने तीन वाजता माहेरी घटना कळविण्यात आली.
इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याचा आग्रह
शवविच्छेदन गृहात आलेल्या डॉक्टरांना पूजाच्या नातेवाईकांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याचा आग्रह केला, मात्र जळगावला तशी सुविधा नाही, त्यासाठी तुम्हाला धुळे येथे मृतदेह न्यावा लागेल असे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यानंतर नातेवाईकांनी तोच मुद्दा लावून धरत धुळ्याचा आग्रह केला. धुळे येथे गेल्यावर अंत्यसंस्कारासाठी होणारा विलंब व अहवालही उशिरा मिळणार असल्याबाबत जाणीव करुन दिल्यानंतर माहेरची मंडळी जळगावात शवविच्छेदनास तयार झाली.
डॉक्टरांनी येथे शवविच्छेदन करण्यास सपशेल नकार दिला. पोलिसांनी विनंती करुनही डॉक्टर तयार होत नव्हते. आई, वडीलांची लेखी घेतल्यानंतरही डॉक्टर आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे व नातेवाईकांनी विनंती केल्यानंतर रात्री आठ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर पती भगवान, सासरे श्रावण मैफत लोहार, सासू यशोदा व दीर रामदास यांना अंत्यसंस्कारासाठी पोलीस वाहनातून ममुराबादला नेण्यात आले. पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पती भगवान श्रावण लोहार याचे पूजाशी दुसरे लगA झाले होते. याआधीच्या प}ीला त्याने घटस्फोट दिला आहे. दरम्यान, दोन वर्षापूर्वीच पूजाशी त्याचा विवाह झाला होता. दोघांना 9 महिन्याचा मुलगा आहे. तर पूजा ही दोन भावांची एकुलती एक बहिण होती. पूजाचे माहेर दादली, ता.सिन्नर, जि.नाशिक येथील आहे. एक भाऊ निलेश आठवीला तर दुसरा राहूल नववीला शिक्षण घेत आहे. भगवान याचे ममुराबाद वेल्डींगचे दुकान आहे.
पूजा हिच्या सासरच्या लोकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिच्या साडीवर असलेले डाग हे मासिक पाळीचे होते तर ह्दयविकाराचा झटका आल्यामुळे दवाखान्यात नेण्याच्या गडबडीत कानातील बाही ताणली गेली त्यामुळे तेथे रक्त आले.
कानातून रक्त आलेले नाही. या डागा मुळेच मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला. असे असले तरी शवविच्छेदन अहवालातच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.