महाविद्यालयात खून झालेल्या तरुणावर पोलीस बंदोबस्तात आसोदा येथे अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:15 PM2019-06-30T12:15:08+5:302019-06-30T12:15:46+5:30
मू.जे.महाविद्यालयातील खून प्रकरण
जळगाव : मू.जे.महाविद्यालयात खून झालेल्या मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (२३, रा. आसोदा) या विद्यार्थ्याचा मृतदेह रविवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात आसोदा येथे नेण्यात येऊन तेथे बंदोबस्तातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मू.जे.महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेसाठी आलेल्या मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे (२३, रा. आसोदा) या विद्यार्थ्याचा चॉपरने भोसकून खून झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये घडली होती. मोठ्या भावावर सपासपवार होत असल्याचा थरार लहान भाऊ रोहित याने आपल्या डोळ्यांनी पाहिला. हल्ला करणाऱ्याला रोहीतने पाठलाग करुन पकडले, मात्र त्याच्याही मानेवर एकाने चॉपर भिरकावला, पण सुदैवाने तो वार रोहीतने चुकविला. अन्यथा आणखी दुसरी मोठी घटना घडली असती.
मुकेश हा वाणिज्य शाखेच्या तिसºया वर्षाची प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी महाविद्यालयात आला होता. लहान भाऊ सौरभ याचाही अकरावीत प्रवेश घ्यावयाचा होता.त्यामुळे मुकेश ही प्रक्रिया करीत असताना दुसरा भाऊ रोहित सेतू कक्षातून कागदपत्रे घेऊन महाविद्यालयात आला असता पार्कींगजवळ पुढे दुचाकीवर तिघं जण होते. त्यांनी अचानक ब्रेक दाबल्याने उतारमुळे त्यांची दुचाकी मागे आली. त्यामुळे रोहित याच्या दुचाकीला त्यांच्या दुचाकीचा धक्का लागला. त्यावरुन या तिघांनी रोहितशी वाद घालून तिघांनी त्याला अडवून मारहाण करायला सुरुवात केली.
रोहित याच्याशी वाद झाल्यानंतर काही क्षणातच तेथे या तिघांच्या दिमतीला आणखी तिघं जण आले. या सहा जणांनी रोहित याला घेरले. त्याने हा प्रकार मोठा भाऊ मुकेश याला सांगितला. झेरॉक्स दुकानावर असलेला मुकेश धावतच आला असता या टोळक्याने दोघांना मारहाण केली. त्यातील लाल कपडे परिधान केलेल्या एका जणाने चॉपर काढून मुकेशच्या कपाळावर व छातीत चॉपरने हल्ला केला. या घटनेमुळे रक्तबंबाळ होऊन मुकेश जागेवरच कोसळ्ला. त्यामुळे हल्लेखोरांनी तेथून पळ काढला.
इच्छारामने बोलावले इतरांना
इच्छाराम पुंडलिक वाघोदे (रा.समता नगर) हा मू. जे. महाविद्यालयात पदवीच्या कला शाखेच्या दुसºया वर्षाला आहे. तो देखील प्रवेशासाठीच आलेला होता. तेथे पार्कींगमध्ये त्याचा रोहीतशी वाद झाला. त्यामुळे इच्छाराम याने किरण अशोक हटकर (रा.नेहरु नगर), अरुण सोनार, व तुषार नारखेडे या तिघांना बोलावून घेतले. त्यातील एकाने मुकेशच्या पोटात, डोक्यात व छातीत चॉपरने हल्ला केला. हल्लेखोर महाविद्यालयाचे विद्यार्थी नाहीत.