आत्याच्या दफनविधीनंतर निघाली भाच्याची अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 09:19 PM2019-09-18T21:19:39+5:302019-09-18T21:19:44+5:30
मन हेलावणारी घटना : थडग्यासाठी विटा पोचवायला गेलेला दानेश बोरीमाईच्या कुशीत कायमचा स्थिरावला
अमळनेर : आपल्या आत्याच्या निधनानंतर स्मशानभूमीत तिचे थडगे बांधण्यासाठी विटा पोचवायला गेलेल्या भाच्याचा परतताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना १७ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.
कसाली मोहल्ल्यातील जयभारत हलवाईच्या कुटुंबातील खैरुनिसा निमन हलवाई (५८) यांचे १६ रोजी निधन झाल्यामुळे दुपारी १ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेची तयारी सुरू होती. कब्रस्थानमध्ये त्यांचे थडगे बांधण्यासाठी मयत महिलेचा भाचा दानेश शेख अरमान (वय १६) हा सोबत शाहीदखा रेहमानखा मेवाती (वय १७) याला घेऊन छोट्या टेम्पोवर विटा घेऊन स्मशानभूमीत गेला. विटा पोहचवून परतताना इतराना पाहून त्याला नदीत पोहण्याचा मोह झाला. म्हणून दोघांनी नदी पात्रात उड्या घेतल्या. मात्र काही क्षणातच शाहीदखा पाण्यात बुडायला लागला म्हणून त्याला वाचवण्यासाठी दानेश धावला. शाहीदने त्याला धरल्यामुळे तोदेखील बुडू लागला. हे दृश्य हिंगोणे येथील पंकज भगवान भिल या तरुणाला दिसले. त्याने क्षणाचाही विचार न करता धावत जाऊन पाण्यात उडी मारली. परंतु तोपर्यंत शाहिद पाण्यात बुडाला होता आणि दानेश डुबक्या घेत जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत होता. पंकजने दानेशला पकडून बाहेर आणले खरे, पण तोपर्यंत श्वास गुदमरून दानेशचा मृत्यू झालेला होता. तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे घटनास्थळी पोहचले. त्यावेळी अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले.
हिंगोणे परिसरातून अवैध वाळू उपसा होत असल्याने २० ते २५ फुटाचे अनेक खड्डे नदी पात्रात केले असल्याने डोहात बुडून दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.
दुपारी ४ वाजता दानेशच्या आत्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. दानेशचे शवविच्छेदन करून सायंकाळी ७ वाजता त्याचीही अंत्ययात्रा काढावी लागली. एकाच दिवशी आत्या व भाच्याची अंत्ययात्रा निघाल्याने कुटुंबाने दु:खाचा आक्रोश केला. दानेशला ३ भाऊ, १ बहीण आहे.
शाहिद मेवाती याचा मृतदेह मंगळवारी सापडला नव्हता. तो बुधवारी आढळून आले. शाहिदचे कुटुंब या घटनेने दु:खात बुडाले आहे. शाहीदला १ भाऊ असून वडील गवंडीकाम करून कुटुंबाची उपजीविका भागवितात.
शाहेदचा मृतदेह सापडला
बोरी नदीपात्रात बुडालेल्या शाहिदचा मृतदेह हिंगोणे परिसरातून कसाली मोहल्ल्यापर्यंत वाहून आला. १८ रोजी सकाळी ६ वाजता परिसरातील नागरिकांच्या नजरेस पडल्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते.
घटनेचे वृत्त कळताच शहरातील नागरिकांनी, पट्टीच्या पोहणाऱ्यांनी धाव घेऊन शाहिदचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी लाईफ जॅकेट घालून स्वत: पाण्यात उडी मारून शोधाशोध केली. मात्र मंगळवारी मृतदेह आढळून आले नव्हते.