गोमतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी वाजत गाजत काढली अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 09:00 PM2020-01-19T21:00:40+5:302020-01-19T21:01:44+5:30
शेती करत असताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गोमातेने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून वाजत गाजत गोमातेची अंत्ययात्रा तिच्याच बैल पुत्रांच्या खांद्यावर काढून सुकडी वाटून तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न तालुक्यतील शिरूड येथील आनंदराव पाटील या शेतकऱ्याने केला.
अमळनेर, जि.जळगाव : शेती करत असताना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गोमातेने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून वाजत गाजत गोमातेची अंत्ययात्रा तिच्याच बैल पुत्रांच्या खांद्यावर काढून सुकडी वाटून तिच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न तालुक्यतील शिरूड येथील आनंदराव पाटील या शेतकऱ्याने केला. अंत्ययात्रेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
आनंदराव पुंडलिक पाटील या शेतकºयाकडे २० वर्षांपासून एक गाय होती. एकाचवेळी ११ लीटर दूध द्यायची. तिच्या आयुष्यात ११ वेळा प्रसूत होऊन बैलांना जन्म दिला . तेच बैल आनंदराव पाटील यांच्या शेतात आजही राबत आहेत. गोमतेचे निधन झाल्यानन्तर सारा परिवार हळहळला.
गोमतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी या परिवाराने वाजत गाजत बैलगाडीवर अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेतला. गोमतेच्या पुत्रांच्या खांद्यावरच अंत्ययात्रा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. बैलगाडीवर गावातून अंत्ययात्रा जात असताना महिलांनी गोमतेची पूजा करून आरती केली.
अंत्ययात्रेत माध्यमिक शाळेचे स्थानिक चेअरमन जयवंतराव पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती श्याम अहिरे, बाजार समिती संचालक डी.ए.धनगर, धर्मेंद्र पाटील, भगवान पाटील, जितेंद्र पाटील, लोटन पवार, भावडू महाजन, विठ्ठल पाटील, वासुदेव पुंडलिक पाटील, संतोष पाटील, योगेश पाटील, भायजी पाटील, विनोद बोरसे यांच्यासह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. आनंदराव यांच्या शेतातच गोमतेचा दफनविधी करण्यात आला. प्रत्येक महिलेनेदेखील मूठभर माती टाकून ओवाळणीत पैसेदेखील टाकले.