मुक्या जीवांच्या वेदनेवर तरुणाई घालणार फुंकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:09 PM2021-01-28T19:09:59+5:302021-01-28T19:10:13+5:30
जळगाव : पशू ॲनिमल प्रोटेक्शन असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने ॲनिमल ॲम्ब्युलन्सचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रस्त्यावरील ...
जळगाव : पशू ॲनिमल प्रोटेक्शन असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने ॲनिमल ॲम्ब्युलन्सचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून रस्त्यावरील जखमी होणाऱ्या प्राण्यांवर उपचार होणार आहेत.
खुशबू श्रीश्रीमाळ, कोमल श्रीश्रीमाळ, भवानी अग्रवाल, अनुज अग्रवाल, हर्षल भाटिया, डॉ. जय राजपूत, दीपांशू दोशी, अभिषेक जैन, तेजू आर्या, विशाल रावलानी, कल्याणी वाघ, भूमिका मंत्री आणि भैरवी जैन या तरुणांनी दीड वर्षापूर्वी मुक्या प्राण्यांसाठी प्रयत्न सुरू केले.
... आणि मिळाली लोकांसह सामाजिक संस्थांची साथ
मुक्या प्राण्यांसाठी काम करीत असताना या तरुणांनी आपल्याला लोकसहभागातून मदत मिळते का? हे पण पाहिले. त्यांच्या प्रयत्नांना काही लोकांसह सामाजिक संस्थांनी साथ दिली. अखेर त्यांनी स्वतःची साधनांनी सुसज्ज अशी ॲनिमल ॲम्ब्युलन्स आणि छोट्याशा जागेत प्राण्यांसाठी हक्काचे निवारागृहही उभारले.
मिळेल मोफत सेवा
रस्त्यावरील प्राण्यांसाठी ही ॲम्ब्युलन्स तयार केली आहे. या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून शहरात मोफत सेवा दिली जाईल. एखाद्या प्राण्याला - मग तो कुत्रा, बकरी, मांजर, गाय किंवा अन्य कोणताही प्राणी असो - त्याचा अपघात झाला किंवा काही वैद्यकीय मदत हवी असेल तर आमच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला की लगेचच ॲम्ब्युलन्स उपलब्ध होईल. संबंधित प्राण्याला तत्काळ निवारागृहात आणले जाईल, त्या ठिकाणी त्यावर उपचार होतील. ही सेवा मोफत आणि सर्वांसाठी खुली असेल, असे असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षा खुशबू श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.