नेरी नाका स्मशानभूमी समोर फर्निचर गोदामाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:34+5:302021-05-28T04:13:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : नेरी नाका स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत असलेल्या लाकडी फर्निचर गोदामाला गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नेरी नाका स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत असलेल्या लाकडी फर्निचर गोदामाला गुरुवारी सायंकाळी सहा वाजता अचानक आग लागली. या आगीत खुर्च्या, टेबल, कपाट आदी साहित्य जळून खाक झाले असून सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान, या गोदामात विद्युत पुरवठा नव्हता, त्यामुळे शॉर्टसर्किटचा विषय येत नाही. कोणीतरी हेतुपुरस्सर ही आग लावल्याचा संशय अनेकांनी व्यक्त केला. गोदाम मालक दस्तगीर शहा रज्जाक शहा यांनीही आगीबाबत संशय व्यक्त केला आहे, मात्र, नाव कोणाचे घेतलेले नाही.
दस्तगीर शहा रज्जाक शहा (रा.सालार नगर) यांच्या मालकीचे हे गोदाम होते. पाच वर्षापासून त्यांनी याठिकाणी व्यवसाय थाटला होता. जुन्या खुर्च्या, कपाट, टेबल व इतर फर्निचरचे साहित्य ते विक्री करीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी पाच लाख रुपयांचे साहित्य खरेदी केले होते. संपूर्ण साहित्य आगीत खाक झालेले आहे.
तीन बंबाद्वारे विझविली आग
आगीची माहिती मिळाल्यानंतर मनपा अग्निशमन दलाच्या तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याद्वारे आग विझवण्यात आली. आगीचे स्वरुप मोठे होते. यामुळे परिसरात पळापळ झाली होती. मुख्य वीज वहिनीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. दरम्यान, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील व इतर नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, शहर वाहतूक शाखा व सहकाऱ्यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन वाहतुकीची कोंडी दूर केली.