बाजार समिती संचालकांच्या राजीनाम्याचा ‘फुसका बार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:17 AM2021-02-13T04:17:13+5:302021-02-13T04:17:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १३ संचालकांनी सभापतींच्या कार्यपध्दतीवर नाराज असल्याचे सांगत, लवकरच राजीनामा देत असल्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव -कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १३ संचालकांनी सभापतींच्या कार्यपध्दतीवर नाराज असल्याचे सांगत, लवकरच राजीनामा देत असल्याचा निर्माण केलेला ‘हायहोल्टेज ड्रामा’ अखेर फुसका बार निघाला आहे. दोनच दिवसात संचालकांनी सभापतीच्या कार्यपध्दतीवर असलेली नाराजी दूर झाली आहे. संचालकांनी राजीनामा न देण्याची भूमिका घेतली असल्याची माहिती सभापती कैलास चौधरी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे. तसेच याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही संचालकांशी चर्चा करून, राजीनामा न देण्याची सूचना दिली.
बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी हे मनमानी पध्दतीने कारभार करत असल्याचा आरोप १३ संचालकांनी केला होता. तसेच या संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडून राजीनामा देण्याचीही तयारी केली होती. मात्र, संचालकांचे राजीनामे अखेर हे खिशातच राहिले आहेत. बाजार समितीत सुरू असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या विकासकाला बाजार समितीकडे दरमहा द्यावयाची रक्कम भरण्याची सूचना सभापतींनी दिली असून, संचालकांची नाराजी दूर करण्यास सभापतींना यश आल्याचेच म्हटले जात आहे. बाजार समितीच्या संचालकांनी बाजार समितीच्या आवारात तयार होणाऱ्या कॉम्लेक्सच्या मंजुरी दिलेल्या बांधकामाची करारनाम्यानुसार कृउबासकडे विकासकाला दरमहा रक्कम भरायची होती. वारंवार नोटीस देऊनही ती भरली नाही, यामुळे संचालकांनी सभापतींविरोधात जाण्याची भूमिका घेतली होती. मात्र, सभापतींनी विकासकाला ही रक्कम त्वरित भरण्याची सूचना दिली.
पालकमंत्री घेणार आढावा
बाजार समितीतील या हायहोल्टेज ड्रामाबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शनिवारी आढावा घेणार आहे. अजिंठा विश्रामगृह येथे सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, पालकमंत्र्यांनी या संदर्भात शुक्रवारी सर्व संचालकांशी चर्चा करून, हा वाद मिटविण्याचा सूचना केल्या होत्या.
दोन दिवसातच नाराजी कशी झाली दूर?
बाजार समितीचे राजकारण कॉम्प्लेक्सभोवती फिरत असून, सभापतींविरोधात संचालकांनी घेतलेली भूमिका दोनच दिवसात का बदलली? याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. दरम्यान, काही संचालकांनी राजीनामा देण्याची घाई केली होती. मात्र, त्याच संचालकांनी ऐनवेळी माघार घेतली असल्याने काही संचालकांनी आता नाराजी व्यक्त केली आहे. राजीनामा द्यायचा नव्हता तर ही भूमिका घ्यावयाची गरजच नव्हती असेही या काही संचालकांनी ‘लोकमत’ला सांगितले.