लग्नाची खरेदी करुन घरी परतणारा भावी नवरदेव जळगावात अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 09:32 PM2020-01-19T21:32:54+5:302020-01-19T21:37:24+5:30
लग्नासाठी लागणारे काही साहित्य खरेदी करुन चुलत भावासोबत दुचाकीने घरी जात असताना समोरुन येणाºया दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भूषण विठ्ठल सोनवणे (२२, रा.देवगाव, ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा चुलत भाऊ रवींद्र भागवत सोनवणे (२७) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी चार वाजता तालुक्यातील किनोद ते फुपणी दरम्यान झाला.
जळगाव : लग्नासाठी लागणारे काही साहित्य खरेदी करुन चुलत भावासोबत दुचाकीने घरी जात असताना समोरुन येणा-या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भूषण विठ्ठल सोनवणे (२२, रा.देवगाव, ता.जळगाव) हा तरुण जागीच ठार झाला तर त्याचा चुलत भाऊ रवींद्र भागवत सोनवणे (२७) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी दुपारी चार वाजता तालुक्यातील किनोद ते फुपणी दरम्यान झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण सोनवणे हा तरुण चुलत भाऊ रवींद्र सोनवणे याच्यासोबत रविवारी जळगावात लग्नाच्या खरेदीसाठी आला होता. धान्य तसेच इतर खरेदी झाल्यानंतर काही साहित्य घेऊन ते दुचाकीने घरी जायला निघाले. दुपारी चार वाजता किनोद ते फुपणी दरम्यान रस्त्यावर समोरुन येणाºया दुचाकीने भूषणच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोन्ही दुचाकीवरील चारही जण रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला गंभीर मार लागल्याने भूषण याचा जागीच मृत्यू झाला. चुलत भाऊ रवींद्र सोनवणे हा देखील गंभीर झाला. दुस-या दुचाकीवरील जितेंद्र हुकूम सोनवणे व बारकू पावरा (रा.फुपणी, ता.जळगाव) हे दोघंही जखमी झाले.
गावक-यांनी घेतली धाव
या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर देवगाव व फपणी येथील गावक-यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले. भूषण याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. रवींद्र याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. ्रजितेंद्र व बारकू या दोघांना खासगी दवाखान्यात नेण्यात आले. फुपणीचे सरपंच कमलाकर पाटील व शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनीही रुग्णालयात धाव घेऊन मदतकार्य केले. तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक कदीर तडवी व सतीश हळणोर यांनी पंचनामा केला.
भूषणचे ३ मार्च रोजी होते लग्न
भूषण याचा पंधरा दिवसापूर्वीच चहार्डी, ता.चोपडा येथील मामाच्या मुलीशी साखरपुडा झाला होता. ३ मार्च रोजी त्याचे लग्न ठरले होेत. त्यासाठी त्याची तयारी सुरु झाली होती. भूषण याचे वडील विठ्ठल माणिक सोनवणे शेती करतात तर आई कलाबाई गृहीणी आहे. भाऊ योगेश व शरद विवाहित असून मोठी बहिण ललीता ही देखील विवाहित आहे.