राज्यभरातून आलेल्या भावी सैनिकांचे जळगावात हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:55 PM2018-11-23T12:55:44+5:302018-11-23T12:58:34+5:30
सैन्य भरतीसाठी आलेल्या उमेदवारांनी वाहनांच्या छतावर झोपून काढली रात्र
सागर दुबे
जळगाव : सैन्य भरतीसाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून दररोज सुमारे सुमारे ५ हजार तरुण येत असतानाही प्रशासनाकडून तात्पुरत्या निवासाची व शौचालयाची व्यवस्था न केल्याचे भावी सैनिकांची प्रचंड गैरसोय होत आहे़ परिणामी, उमेदवारांना नाईलाजास्तव मोकळे मैदान, उद्याने तसेच बंद दुकानांच्या ओट्यांसह फुटपाथचा झोपण्यासाठी आधार घ्यावा लागत आहे़ शौचालयाची सुविधाच उपलब्ध करून न दिल्यामुळे उमेदवारांना मोकळ्या जागेवरच प्रांत:विधी करावी लागत आहे़ यामुळे शिवतीर्थ मैदानावर प्रचंड दुर्गंधी पसरली आहे़
सोमवारच्या मध्यरात्रीपासून छत्रपती महाराज क्रीडा संकुल येथे खुल्या सैन्यभरतीला सुरूवात झाली आहे़ या पार्श्वभूमीवर लोकमत प्रतिनिधीने बुधवारी रात्री शहरात फेरफटका मारत उमेदवारांच्या समस्या जाणून घेतल्या़ आतापर्यंत परभणी, नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील उमेदवारांची मैदानी चाचण्या झाल्या आहेत़ बुधवारी मध्यरात्री जालना येथील उमेदवारांनी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार होती़ त्यामुळे जालना जिल्ह्याच्या कान्याकोपºयातून तब्बल ५ हजार ९२ उमेदवार बुधवारी रेल्वे, बस व स्वतंत्र वाहन करून शहरात दाखल झाले. सायंकाळनंतर उमेदवारांनी भरलेली शेकडो वाहन शहरात दाखल झाली़ म्हणून सायंकाळी ७ वाजेनंतर शहरातील महात्मा गांधी उद्यान ते रेल्वेस्टेशन रस्त्यापर्यंत तरूणांची प्रचंड गर्दी झाली होती.
सैन्य भरती होत असल्यामुळे अनेक स्पर्धा परीक्षा चालकांकडून पॅम्पलेट वाटली जात आहेत़ त्यामुळे ती वाचून फेकली जात असल्यामुळे रात्री शिवतीर्थ मैदानापासून तर गांधी उद्यानापर्यंत जागो-जागी रस्त्यावर पॅम्पलेटस् पडलेली दिसून आले़ त्यामुळे चांगलाच कचरा साचलेला बघायला मिळाला़
खाद्यपदार्थांचे ठिकाण फुल्ल
शहरातील खाऊगल्ली, स्टेडीयम परिसर, भजेगल्ली, बहिणाबाई उद्यान आदी परिसरातील खाद्य पदार्थांच्या ठिकाणांवर उमेदवारांची प्रचंड गर्दी होती़ अनेकांनी हॉटेलांमध्ये जेवन घेतले़ भजेगल्लीतील प्रत्येक हॉटेल्स उमेदवारांनी फुल्ल झालेली होती़
बॅरिगेटस्जवळ मांडला ठिय्या
उमेदवारांना पोलीस स्केटींग क्लब येथून प्रवेश दिला जात आहे़ त्यामुळे आपला क्रमांक लवकर लागावा म्हणून प्रवेशाच्या ठिकाणाजवळच उमेदवारांनी ठिय्या मांडला होता़ झोपही तेथेच घेतली़ मध्यरात्री बारावाजेपासून भरतीला सुरूवात झाली़ अन् ५ हजार ९२ उमेदवारांनी आत प्रवेश घेतला़ गुरूवारी सकाळपर्यंत सर्व उमेदवारांच्या चाचण्या घेण्यात आल्या़ या पाच हजार उमेदवारांमधून फक्त २९८ उमेदवाराच लेखी परीक्षेसाठी पात्र ठरली़ मध्यरात्री जे उमेदवार धावण्याच्या चाचणीत बाद झाले़ त्यांनी रात्रीच परतीचा मार्ग पकडला़ रात्री उशिरापर्यंत क्रीडा संकूल परिसर गजबलेले होते़
उमेदवारांसाठी व्यवस्था़़़
राज्य परिवहन निवृत्ती कर्मचारी संघटनेचे शिवाजी हटकर, गुलाब शेख, कामगार संघटनेचे सुरेश चांगरे यांच्यासह इतर संघटनेच्या पदाधिकाºयांनी उमेदवारांसाठी नवीन बसस्थानकात झोपण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे़ तसेच उमेदवारांना खिडची वाटप केली जात आहे़
नारळपाणी, केळी हातगाड्यांवर गर्दी
काहींनी जेवन न करता केळी, नारळपाणी व पोहे खावून रात्र काढली. त्यामुळे रात्री दहा वाजेच्या सुमारास भजे गल्लीतील सफरचंद, केळी तसेच नारळपाणीच्या हातगाड्यांवर प्रचंड गर्दी झालेली होती़
दुर्घटनेची शक्यता़़़़
पोलीस मुख्यालयापासून तर क्रीडा संकूलपर्यंत भिंतीच्या आडोश्याला उमेदवार मिळेल त्या ठिकाणी झोपत आहेत़ या रस्त्यावरुन शेकडो वाहने ये-जा करतात. त्यामुळे एखादी दुर्घटना देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही़ म्हणून त्या ठिकाणी पोलीस किंवा सैनिक उभा करावा अशी मागणी काही उमेदवार व नागरिकांकडून होत आहे़
कागदपत्रांसाठी धावपळ
मोबाईलच्या टॉर्चच्या सहाय्याने आपण आणलेले कागदपत्र हे बरोबर आहेत की नाही तपासत कागदपत्रांची जुळवा-जुळव करीत होते़ ज्या उमेदवारांजवळ झेरॉक्स प्रती नाहीत असे उमेदवार झेरॉक्स दुकान शोधताना दिसून आले.
वाहनांच्या छतावर काढली रात्ऱ़़़
प्रशासनाकडून निवासस्थानाची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे अनेकांनी बंद दुकानांच्या बाहेर तर कुणी गांधी उद्यान, नवीन बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन, क्रीडा संकूल तसेच शिवतीर्थ मैदान आदी ठिकाणी आसरा घेतला़ या ठिकाणी झोपून रात्र काढली़ काहींनी वाहनातच झोप घेतली़ ज्यांना वाहनात जागा मिळाली नाही़ त्यांनी चक्क वाहनाच्या छतावर झोपून रात्र काढली़