गगन सदन तेजोमय....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:12 AM2021-05-28T04:12:41+5:302021-05-28T04:12:41+5:30
स्ट्रीप्- सहज सुचलं म्हणून लेखक - संजीव बावस्कर, नगरदेवळा नमो भास्करा दे, अनोखा प्रकाश. तनाचा, मनाचा कराया विकास ...
स्ट्रीप्- सहज सुचलं म्हणून
लेखक - संजीव बावस्कर, नगरदेवळा
नमो भास्करा दे, अनोखा प्रकाश.
तनाचा, मनाचा कराया विकास आजची स्वच्छ सकाळ ! सकाळचा थंडगार वारा बऱ्यापैकी अंगाला झोंबत होता. खान्देशातील कडाक्याच्या उन्हात अंगावरून हळूवारपणे मोरपीस फिरवावं तसं अलवारपणे स्पर्शून जाणारी सकाळ. पूर्व दिशेला आकाशात रंगांची मुक्तहस्ते उधळण सुरू होती.
आजूबाजूला असलेला निसर्ग पावलोपावली आपल्याला खुणावत असतो. लक्ष वेधून घेत असतो याचे भानही आपल्याला राहत नाही.
सुरेल पक्षांच्या सुंदर आलापी, एखाद्या कसलेल्या गवैय्याप्रमाणे सूर छेडत असतात पण त्या कधी आपल्या कानापर्यंत पोहोचतच नाही. भल्याशा झाडाच्या फांद्यांजवळून जाताना अचानक हवेचा झोका येतो आणि पानांची सळसळ कानात घुसते.
निसर्ग आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला त्याच्याशी एकरूप होण्याची कधी अनुभूती होत नाही.
रस्त्याच्या कडेला व शेतशिवारातील पक्ष्यांच्या लांबपर्यंत ऐकू येणाऱ्या सुरेल ताना कानांना तृप्त करत असतात. सहज लक्ष पूर्वदिशेकडे जाते. आकाशात मस्तपैकी रंगपंचमीचा खेळ सुरू होता. भल्यामोठ्या कॅनव्हासवरती उच्च प्रतीचे रंग मुक्त हस्ताने उधळण करत एखाद्या कसलेल्या चित्रकाराने पाहता-पाहता कॅनव्हास सजवावा तसा निसर्गाने पूर्वेचा पट सजवला होता.
भव्यदिव्य निळ्याशार पडद्यावर शामल वर्णी मेघांची दाटीवाटीने असलेली गर्दी पाखरांप्रमाणे कधी झुंड बनून तर कधी विरळ होत गिरक्या घेत होती. एखाद्या फॅशनेबल युवतीने कपाळावरची बट गोल्डन कलर डाय मध्ये रंगवावी तशी रंगवायला सुरुवात केली होती. मेघराजाच्या या फॅशनधुंदीत बॅकग्राउंडला असलेली निळाई नवथरल्यासारखी नाचत होती.
एकच तो निळा रंग, पण त्याच्या अनेक छटा डोळ्यांचे जणू पारणे फेडीत होत्या आणि तळाशी असलेला तो तप्त सुवर्ण रसाचा लाव्हा काळ्या तुकतुकीत ढेकळांमधून बाहेर येईल की काय? असे वाटत होते.
' मार्तण्ड जे तापहीन ' असे ज्ञानदेवांनी पसायदानात लिहिले ते नक्कीच असा सूर्योदय पाहून ! हनुमंताला वेड लावणारा हा बालस्वरूप दिनमणी ! ही निसर्गाची मुक्त उधळण बघताना ' मंत्रमुग्ध होणे' या वाक्यप्रचाराचा खरा अर्थ कळत होता.
प्राचीन काळी सर्वच ऋषी-मुनींना व प्रतिभावंत महाकवींना या सूर्योदयाने भुरळ पाडली. हिरण्यवर्ण गर्भ तेजाच्या अंशतः लाभाने आपणही प्रदिप्त व्हावे हे सकल जन्माचे मनोरथ प्रत्येकाच्या अंतर्मनात असते.
' तमसो मां ज्योतिर्गमय ' अर्थात विश्वातील अंधकारासोबत मनातलाही अंधकार नाहीसा होऊन अंतर्बाह्य ज्ञानरूपी प्रकाशाने प्रज्वलित होण्याची प्रेरणा या प्रार्थनेत त्यांनी प्रकट केली.
आपल्या पूर्वजांनी निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास केला. निसर्ग हा प्रेरक आहे. वरदायी आहे, म्हणून त्यांनी निसर्गातील प्रत्येक घटकाला दैवत मानले. त्याची आराधना केली. या पंचमहाभूतांच्या रौद्र व संहारक स्वरूपाची स्तुती गायली तशी त्याच्या शांत, शीतल व सौम्य स्वरूपाची ही स्तुती केली. या पंचमहाभूतांचे संचालन करणारा निर्गुण-निराकार ' विश्वात्मक देव ' म्हणून अशा एकेश्वरवादाचा पायाही त्यांनीच घातला.
संत ज्ञानदेवांनी पाचव्या अध्यायात लिहिले आहे
'जशी पूर्व दिशेच्या राउळी,
उदय येताची सूर्य दिवाळी।
की येरी ही दिशा तिची काळी,
काळिमा नाही ।।
अर्थात पूर्व दिशेच्या घरी सूर्य उगवला म्हणजे तेथे प्रकाशाची दिवाळी होते आणि दुसऱ्या दिशांची काळिमा मात्र जशीच्या तशी राहते असे कधी घडले आहे काय? तर अजिबात नाही. तसाच ज्ञानरूपी प्रकाश हा व्यक्तीच्या अंतर्मनातील सूक्ष्म अंधारदेखील नाहीसा करतो.
आपल्या ग्रंथांमध्ये सूर्याची असंख्य नावे आहेत, परंतु बारा नावांना विशेष महत्त्व आहे. या नावांचा उच्चार करतांना बारा सूर्यनमस्कार व प्रत्येक नमस्कारात बारा स्टेप या पद्धतीने नमस्कार काढण्याची रीत वर्णन केली आहे. याचा संबंध योगशास्त्राची जोडला आहे. योगशास्त्रात सूर्यनमस्काराला सर्वांगसुंदर व्यायाम म्हणून गौरविले आहे. प्राचीन मूर्तीशास्त्रातदेखील मूर्तिकारांनी अग्रक्रम दिला तो सूर्यमूर्तीनाच ! त्याकाळी सूर्याची स्वतंत्र मंदिरेदेखील आपल्याला आढळतात.
' तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज ।
दिव्य तुझ्या तेजाने, झगमगले भुवन आज ।
हे दिनमणी व्योमराज... ' वसंतराव देशपांडे यांचा स्वर कानात रुंजी घालू लागला. आपोआपच दोन्ही कर जुळले गेले व मनोमन त्याला प्रणिपात केला.' हे हिरण्यकेशा, तू आम्हास आत्मबल प्रदान कर ! जीवनातल्या प्रत्येक दुःखाशी लढण्याची शक्ती दे. ही सकारात्मक ऊर्जा आम्हालाच निर्माण करायची आहे, तू प्रेरक शक्ती बनून अखिल जीवनातील वेदनांशी लढण्याची आम्हांस प्रेरणा दे ! निसर्गापासून फटकून वागणाऱ्या माणसाचे अपराध पोटात घेऊन पुन्हा निसर्गाच्या कुशीत त्याला अलगदपणे सामावून घे ! तो मायेचा, ममतेचा जिव्हाळा त्याच्या अंतर्मनात निर्माण कर ! निसर्गाशी एकरूप होण्यासाठी आम्हाला सुबुद्धी दे ! '