आदर्शनगरात घरफोडी करणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 09:26 PM2020-07-17T21:26:36+5:302020-07-17T21:26:47+5:30
एलसीबीची कारवाई : तीन जणांना अटक
जळगाव : शहरातील आदर्श नगर भागातील रवींद्र नगरात वास्तव्यास असलेल्या कोमल सत्यनारायण पिंकुरवार यांच्या बंद घरातून सुमारे साडेदहा हजार रूपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला शुक्रवारी एलसीबीच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे़ समीर हमीद काकर, मोहनसिंग जगदीशसिंग बावरी, दीपक शांताराम रेणूके (सर्व रा़तांबापूरा) अशी त्या चोरट्यांची नावे आहेत़
एरंडोल येथे वन परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या कोमल पिंकुरवार ह्या रवींद्र नगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत़ दरम्यान, त्या २१ जून रोजी वडीलांसोबत परभणी येथे गेल्या होत्या़ तर पती वर्धा येथे नोकरीला असल्यामुळे घरी कुणीही नव्हते़ हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घरात दहा हजार रूपये रोख व पाचशे रूपये किंमतीचे एक भार वजनाचे चांदीचे पायातील जोडवे चोरून नेले होते़ त्यानंतर १७ जुलै रोजी ही घटना उघडकीस आली होती़ याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
अन् त्याने सांगितले साथीदारांची नाव
दरम्यान,पोलिसांना रविंद्र नगरात घरफोडी करणारी टोळी ही तांबापुरातील असून त्यातील एक चोरटा हा गवळी वाड्यात असल्याची माहिती गुरूवारी मिळाली़ त्यानंतर समीर हमीद काकर यास गवळी वाड्यातून अटक करण्यात आल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देवून ती चोरी मोहनसिंग बावरी व दीपक रेणूके यांच्या मदतीने केल्याचे सांगितले़ त्यानुसार मोहनसिंग याला तांबापुरातून तर दीपक याला गणपतीनगरातून अटक करण्यात आली.
चोरीची दिली कबुली
या चोरट्यांनी रवींद्र नगरात चोरी केल्याची कबुली दिली आहे़ त्याचबरोबर आदर्शनगरातीलच रहिवासी विनित रमण पाटील यांच्या घरातही चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे़ चोरट्यांकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे़ विशेष म्हणजे, या टोळीने आदर्शनगरात सुमारे चौदा ते पंधरा घरफोड्या केल्याचा संशय पोलिसांना आहे़ लवकरच याचा उलगडा होण्याची शक्यता आहे़