जळगावात उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्या तळीरामांना जेलची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:03 PM2018-11-28T12:03:04+5:302018-11-28T12:03:27+5:30
सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांची कारवाई
जळगाव : नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी सोमवारी व मंगळवारी रात्री हातगाड्यावर मद्यप्राशन करणाºयांविरुध्द कारवाईची मोहीम राबविली. त्यात माजी नगरसेवक अजय चुडामण पाटील (वय ४८, रा. गणेशनगर, जळगाव) यांच्यासह २१ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुध्द जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
सोमवारी रात्री ८ ते १० या वेळेत कारवाईची मोहीम राबविण्यात आली. धरपकड सुरु असताना अनेक मद्यपी पळून जाण्यात यशस्वी झाले. पांडे चौक, बेंडाळे चौक, आंबेडकर मार्केट, रेल्वे स्टेशन परिसरात ही मोहीम राबविण्यात आली. हातगाड्यांवर मद्यप्राशन करीत असलेल्या २१ जणांवर कारवाई केली. या सर्व जणांना रात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले. त्यानंतर मंगळवारी दुपारी न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. वैयक्तिक जातमुचलक्यावर या तळीरामांची सुटका करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी अजिंठा चौकात दोघांवर कारवाई करण्यात आली.
डॉक्टर व रोहन यांच्यात वाद
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ.नीलाभ रोहन यांनी तळीरामांना पकडल्यानंतर जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणीसाठी नेले असता तेथे वैद्यकिय अधिकारी डॉ.दिनेश खेताडे व डॉ.रोहन यांच्यात वाद झाला. तपासणी न करता प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या मुद्यावर डॉ.रोहन यांनी आक्षेप घेतला. रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करावी अशी विनंती डॉ.रोहन यांनी केली, मात्र तुम्ही मला लेखी द्या मग मी तपासणी करतो,असे त्यांनी सांगितल्याने वाद झाला.
कार्यमुक्त डॉक्टरने केली वैद्यकिय तपासणी
मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकिय अधिकारी डॉ.खेताडे यांची यावल येथे बदली झालेली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयातून कार्यमुक्तही करण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांना आरोपींची वैद्यकिय तपासणी करण्याचा अधिकार नसतानाही त्यांनी तपासणी केली. सोमवारी रात्री डॉ.अजय सोनवणे यांची ड्युटी होती. त्यांच्याजागी डॉ.खेताडे यांनी काम पाहिले.
डॉ.खेताडे यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. रात्री नेमका काय प्रकार झाला माहित नाही. त्याबाबत माहिती घेतो. ड्युटी नसताना वैद्यकिय तपासणी केली असेल तर डॉ.खेताडे यांच्यावर कारवाई केली जाईल.
-डॉ.किरण पाटील, वैद्यकिय अधीक्षक