जुगाराचा डाव उधळला; २७ जण जाळ्यात, एक लाख ६७ हजार रुपयांची रोकड ताब्यात
By विजय.सैतवाल | Published: October 10, 2023 12:03 AM2023-10-10T00:03:29+5:302023-10-10T00:03:39+5:30
चार दुचाकी, मोबाईल जप्त; एलसीबीची कारवाई
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: नेरी नाका परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी छापा टाकला. त्या ठिकाणाहून एक लाख ६७ हजार रुपयांच्या रोकडसह चार दुचाकी जप्त करुन २७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नेरीनाका परिसरात मोठा जुगाराचा अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश राजपूत, पोउनि गणेश वाघमारे, पोहेकॉ राजेश मेढे, महेश महाजन, किरण चौधरी, श्रीकृष्ण देशमुख, भगवान पाटील, पोकॉ हरिष परदेशी या पथकाने नेरीनाका परिसरात असलेल्या जुगार अड्ड्यावर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास छापा टाकला. तेथे असलेल्या एकेकाला ताब्यात घेण्यास सुरूवात केली. एकामागून एक अशा २७ जुगारींना जुगाराच्या खेळातून उचलून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून घोळातील रोख एक लाख ६७ हजार रुपये रोख रक्कम चार दुचाकी व १८ मोबाईल जप्त केले. सर्व जुगारींना ताब्यात घेण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत अटकेसह कायदेशीर कारवाई सुरु होती.
अधिकाऱ्यांशी साधला जाऊ लागला संपर्क
मोठ्या राजकीय व्यक्तीचा वरद हस्त असल्याचे सांगत हा जुगार अड्डा चालवला जात होता. एक अधिकारी, पाच कर्मचारी अशा मोजक्याच पथकाने सुरुवातीला छापा टाकला असता पोलिसांना पाहून जुगाऱ्यांनी धुम ठोकली. मुख्य बाजारपेठेचा परिसर असल्याने जो-तो पळू लागल्याने काही वेळ गोंधळ उडाला. जुगाऱ्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोशल क्लबच्या नावाने जुगार चालवला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्या संदर्भात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही काहींनी संपर्क साधल्याचे सांगण्यात येत आहे.