भुसावळ येथे जागर प्रतिष्ठानतर्फे ग्रंथपूजन व जागर गौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:43 PM2018-09-22T15:43:15+5:302018-09-22T15:44:18+5:30
ग्रंथांचा जागर सशक्त समाजासाठी उपयुक्त - आमदार एकनाथराव खडसे
भुसावळ, जि.जळगाव : समाजात खऱ्या अर्थाने जागृती घडवून आणायची असेल तर पुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अगदी लहानपणापासून विविध प्रकारची पुस्तके संस्कारमय घडवणारी असल्याने या पुस्तकांचा मनुष्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यात खूप मोठा मोलाचा वाटा असतो. त्यामुळे या पुस्तकांचा जागर करणे ही एक सशक्त समाज घडविण्यासाठी आजची गरज असल्याचे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे केले.
येथील ब्राह्मण संघात जागर प्रतिष्ठानच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित जागर गौरव सोहळा व ग्रंथपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख वक्ते साहित्यिक प्रा.डॉ.किसन पाटील, प्रमुख पाहुणे ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फलक, भुसावळ विभागीय पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर, जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण समिती सदस्य रवींद्र पाटील, जि.प.सदस्य प्रभाकर सोनवणे, काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश राणे, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, पिंटू ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रंथ पूजन करण्यात आले.
ऐनपूर येथील सरदार वल्लभाई पटेल विद्यालयातील शिक्षक महेंद्र भोई यांनी स्वलिखित जागर गीत सादर केले. त्यांना संस्कृती पाठक व मोहित जमोदकर यांनी संगीत साथ दिली. जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केले.
तिघांना जागर गौरव पुरस्कार २०१८ प्रदान
सामाजिक व आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भुसावळ येथील बालरोग तज्ज्ञ डॉ.नीलिमा संजय नेहेते, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप वसंतराव पाटील आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल रमेश सरकाटे अशा तिघांना जागर गौरव २०१८ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमात राज्यातून एसटीआय परीक्षेत तृतीय पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पाटील व जागतिक पातळीवर इस्रो या बंगळुरू स्थित संस्थेत सादर केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाला पुरस्कार मिळालेल्या समीक्षा नितीन पाटील हिचादेखील गौरव करण्यात आला.
यशस्वितेसाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष ऋषिकेश पवारश सचिव प्रा.नीलेश गुरुचल, कायदेशीर सल्लागार अॅड. हरिष कुमार पाटील, संचालिका लीना पाटील, प्रमिला सोनवणे, जागर मित्र डॉ.जगदीश पाटील, पवन पाटील, गोकुळ सोनवणे, विलास पाटील, रमेश कोळी, निर्मला दायमा, ज्ञानेश्वर घुले, अमित चौधरी यांनी परिश्रम घेतले. प्रा.जितेंद्र महंत यांनी आभार मानले.