जळगावात मिळालेल्या मानपत्राच्या काष्ठमंजुषाचा गांधींनी केला होता लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:49+5:302021-02-05T05:50:49+5:30

आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९२७ मध्ये जळगावला भेट दिली होती. त्यावेळी ...

Gandhi had auctioned the wooden box of honor received in Jalgaon | जळगावात मिळालेल्या मानपत्राच्या काष्ठमंजुषाचा गांधींनी केला होता लिलाव

जळगावात मिळालेल्या मानपत्राच्या काष्ठमंजुषाचा गांधींनी केला होता लिलाव

Next

आकाश नेवे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १९२७ मध्ये जळगावला भेट दिली होती. त्यावेळी जळगावच्या रेल्वेस्थानकावर तत्कालीन नगरपालिकेने मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला होता. त्यावेळी हे मानपत्र ठेवण्यासाठी एक काष्ठमंजुषादेखील होती. त्या काष्ठमंजुषेचा गांधींनी जळगावच्या रेल्वेस्थानकावरच लिलाव केला होता आणि त्यातून खादी यात्रेसाठी निधी उभा केला होता. त्यासोबत त्यांनी शहादा येथून ३०० आणि दोंडाईचा येथून २०० रुपये संकलित केल्याचे यंग इंडियातील एका लेखातून समोर आले आहे. मात्र अशा मंजुषा लिलावाची सुरूवात त्यांनी जळगावलाच केली होती.

महात्मा गांधी हे नि:स्वार्थी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या या गुणांनुसार त्यांच्यावर सातत्याने संशोधन करण्यात आले आहे. मात्र देशकार्यासाठी निधी उभारणी करताना त्यांनी अनेक वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला. ही बाब फारशी उजेडात आलेली नाही. या अनुषंगाने फारसे संशोधनदेखील झालेले नाही. जळगावचे डॉ. अश्विन झाला यांनी गांधीजींच्या या अपरिचित पैलूंवर संशोधन केले आहे. त्यात ही बाब समोर आली आहे.

२७ फेब्रुवारी १९२७ ला यंग इंडियात आलेल्या लेखानुसार गांधींनी जळगाव, शहादा, दोंडाईचा या ठिकाणाहूनदेखील निधी गोळा केला होता. या लेखातच लिहिले आहे की, ‘शहादासारख्या लहान गावातून एका मंजुषेला ३०० रुपये मिळाले तर दोंडाईचातदेखील एक तबकडी आणि अन्य वस्तूंना २०० रुपये मिळाले आहेत.’

गांधीजींच्या या दौऱ्यात सर्वच ठिकाणच्या मंजुषा लिलावात विकल्या होत्या. त्याची सुरुवात मात्र जळगावमधून झाली होती.

याबाबत जळगावमध्ये महात्मा गांधी यांनी सांगितले होते की, ‘या वस्तूंचे एक कलात्मक मूल्य आहे. त्या गुजरात विद्यापीठाच्या संग्रहासाठी प्रा. मलकानी यांच्याकडे सुपूर्द करणार आहोत. मात्र त्यासोबतच अनेक वस्तू आहेत ज्या सोबत नेऊ शकत नाही. त्या वस्तूंची विक्री करणे हा एकच मार्ग आहे. असे नाही की मी प्रेमाने दिलेल्या वस्तूंचा अनादर करत आहे. हा पैसा त्या कामासाठी आहे जे मला प्रिय आहे. या मंजुषांचे पैसे करून मी त्या प्रेमाची परतफेड यथासंभव नक्कीच जास्त चांगल्या पद्धतीने करेन.’

सध्या महात्मा गांधी यांना दिलेल्या या मानपत्राची एक प्रत जळगावच्या महात्मा गांधी उद्यानात दगडात कोरलेली आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात ३०० पेक्षा जास्त वेळा निधी संकलित केला होता. त्याचा उपयोग त्यांनी विविध समाजोपयोगी कामांसाठी केला. त्यांना जळगावमध्ये विकलेल्या मंजुषेतून किती पैसे मिळाले होते किंवा ती कुणी घेतली होती हे अद्याप समोर आलेले नाही. याबाबत अजूनही संशोधन सुरू आहे.

Web Title: Gandhi had auctioned the wooden box of honor received in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.