जुन्या टायरपासून साकारली गणेशमूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 08:27 PM2019-09-10T20:27:57+5:302019-09-10T20:28:06+5:30
पारोळा : येथील स्वराज्य गणेश मंडळाने यंदा जुन्या टाकाऊ टायरपासून साकारलेली विलोभनीय गणेशमूर्ती साकारली शहरात आकर्षण ठरली आहे. ...
पारोळा : येथील स्वराज्य गणेश मंडळाने यंदा जुन्या टाकाऊ टायरपासून साकारलेली विलोभनीय गणेशमूर्ती साकारली शहरात आकर्षण ठरली आहे.
येथील लोहार गल्लीतील स्वराज्य गणेश मंडळाने यंदादेखील युको फ्रेंडली गणपतीची स्थापना केली आहे. दरवर्षी मंडळाचे पदाधिकारी नाविन्याचा शोध घेऊन टाकाऊ पासून मनमोहक अन् पर्यावरण पूरक देखावा साकारतात. यावर्षी मंडळाने तब्बल ४५० टाकाऊ टायरचा वापर केला आहे. त्यात ट्रॅक्टर, रिक्षा, ट्रक, मोटारसायकल, सायकल अशा विविध गाड्यांचे टायर वापरण्यात आले आहेत. सुंदर आकर्षक मूर्तीसह सजावट करून शरतील इतर गणेश मंडळांपैकी स्वत:चे वेगळेपण सिद्ध केले आहे.
स्वराज्य मित्र मंडळाचे हे अकरावे वर्ष असून तब्बल चार वेळेस मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मंडळातर्फे विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे मौलिक संदेश मंडळाच्या माध्यमातून दिले आहेत.
आज रक्तदान शिबिर
मंडळाच्या वतीने सामाजिक बांधिलकी राखत ११ सप्टेंबर रोजी श्रीनिवास भाऊ वाचनालयात सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रक्तदाना करण्याचे आवाहन अध्यक्ष चेतन चौधरी, उपाध्यक्ष सौरभ लोहार, खजिनदार अक्षय चव्हाण, कार्याध्यक्ष राज लोहार, प्रिन्स जैस्वास्ल, करण साळी,आदित्य लोहार यांनी केले आहे.