Ganesh Visarjan 2018 : जळगावात बाप्पाला भावपूर्ण निरोप, चार जणांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 01:44 AM2018-09-24T01:44:52+5:302018-09-24T01:45:11+5:30
जळगाव - जिल्ह्यात लाडक्या गणपती बाप्पाला रविवार, २३ रोजी भाविकांकडून भावपूर्ण निरोप देण्यात आला. मिरवणुकीत ढोल पथके, लेझिम, यासह गोफनृत्य, लाठी, तलवारबाजी, आखाडा आदी विविध क्रीडा प्रकारांमुळे चांगलीच रंगत आली. दरम्यान जिल्ह्यात चार जणांचा विसर्जनावेळी मृत्यू झाल्याचे चौघांच्या कुटुंबावर विघ्न ओढावले.
गणेशोत्सवामुळे गेल्या ११ दिवसापासून शहरात चैतन्य व हर्षोल्हासाचे वातावरण होते. रविवारी सकाळी जळगाव मनपाच्या मानाच्या गणपतीची आरती मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येऊन विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. यंदा जिल्ह्यात २ हजार ११७ मंडळाकडून ‘श्री’ स्थापना झाली होती. त्यापैकी १४९ मंडळांकडून पाचव्या दिवशी विसर्जन झाले. उर्वरित १ हजार ९६८ मंडळांकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरु होते. यावेळी विसर्जनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.
जळगावच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य राहिले ते डीजे मुक्त मिरवणूक. पारंपरिक वाद्यांनी मिरवणुकीत चांगलीच रंगत आणली. दुपारी नेहरु चौक मित्र मंडळाचे वाहन नादुरुस्त झाल्याने कार्यकर्ते व पोलिसात वाद झाला. यामुळे मंडळाला मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आले, मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने मंडळ पुन्हा मिरवणूक रांगेत सहभागी झाले. जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्येही गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पहूर येथे मुस्लीम बांधवांनी बाप्पाची आरती केली.
जळगाव जिल्ह्यात विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू
जळगाव जिल्ह्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या चार वेगवेगळ्या घटना रविवारी घडल्या. अविनाश ईश्वर कोळी (वय २०, या.सुप्रीम कॉलनी, जळगाव) या तरुणाचा जळगावनजीक तलावात बुडून मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यात तापी नदीत नितीन ऊखा मराठे वय ३२ (रा. ऑर्डनन्स फॅक्टरी, दर्यापूर शिवार) याचा बुडून मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत पळासखेडे बुद्रूक ता.जामनेर येथे गणपती विसर्जन करतांना मनीष वामन दलाल (जामनेर) या युवकांचा नदीत बूडून मृत्यू झाला. त्या पाठोपाठ भडगाव येथील लाडकूबाई माध्यमिक विद्यामंदिर येथील इयत्ता 10 वीचा विद्यार्थी प्रफुल्ल रमेश पाटील ( रा. वलवाडी ता.भडगाव ) या विद्यार्थ्यांचा श्री गणेश मूर्ती विसर्जनादरम्यान पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.