बाप्पा मोरया रे... जळगावच्या गणेशमूर्ती पोहोचल्या स्वित्झर्लंड अन् अमेरिकेतही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 10:18 PM2022-08-30T22:18:12+5:302022-08-30T22:18:58+5:30
राजू राणा यांनी सांगितले की, भगवान नारायण राणा यांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली.
जळगाव : शहरातील राणा कुटुंब मोठ्या आकारातील गणेश मूर्ती बनविण्यासाठी ओळखले जाते. ७० वर्षांपासून ते हे काम करीत आहेत. त्यांच्यामुळे जळगावच्या मूर्तिकलेची प्रसिद्धी विदेशात झाली आहे. काही जणांनी दिलेल्या आव्हानातून राणा कुटुंबातील आधीच्या पिढीने जिद्दीने ही कला शिकून घेतली.
राजू राणा यांनी सांगितले की, भगवान नारायण राणा यांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. त्यांनी भाऊ चंदुलाल राणा यांना प्रोत्साहन दिले. नंतर दोघांनी मिळून हे काम सुरू केले. त्यावेळी मूर्ती बनविण्याची साधने कमी असायची. हँडपम्पने रंग दिला जायचा, तर शेडिंगसाठी काठीला कापूस लावून काम भागविले जायचे. यांचा बैलाचा घाणा होता. ते उसाचा रस विकायचे. जामनेरहून आलेल्या काहीजणांनी एकदा त्यांना तुम्ही काय मूर्ती बनविणार, असे आव्हान दिले. त्या जिद्दीतून राणा कुटुंबातील आधीच्या पिढीने मूर्तिकला शिकून घेतली. काळी, पिवळी माती व इतर घटक एकत्र करून मूर्ती बनवायचा प्रयत्न केला. या कलेत पारंगत होण्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली.
आतापर्यंत सर्वांत उंच मूर्ती १८ फुटांची
राणा २० ते २५ वर्षांपूर्वीपर्यंत शाडू मातीच्या मूर्ती बनवीत असत. नंतर पीओपीचा ट्रेंड आला. पीओपीमध्येही बरेच प्रकार आहेत. मूर्ती बनविण्यासाठी जे वापरले जाते ते १० ते १५ दिवसांत विरघळते. आतापर्यंतची सर्वांत उंच मूर्ती १८ फुटांची बनविलेली आहे, असे राजू राणा यांनी सांगितले. त्यांच्याकडील मूर्ती काश्मीर, कन्याकुमारी, राजकोट, जालना, मनमाड रेल्वे स्टेशन, पुणे, नाशिक, विदेशांत स्वित्झर्लंड व अमेरिका या ठिकाणी पाठविण्यात आलेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.