"जळगावात पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा"
By अमित महाबळ | Published: September 30, 2023 09:07 PM2023-09-30T21:07:22+5:302023-09-30T21:07:35+5:30
यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले.
जळगाव : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी यावर्षी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेल्याचा अंदाज आहे. समारोपाला २० तास लागले. सर्वांच्या सहकार्याने शिस्तबद्धरीत्या मिरवणूक पार पडली असली, तरी शहराच्या एकाच भागात होणारी भाविकांची अमाप गर्दी, गणेश मंडळांची वाढती संख्या, मिरवणुकीला लागणारा वेळ आणि प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता पुढील वर्षी दोन स्वतंत्र मिरवणुका काढण्यावर आतापासूनच गणेश मंडळांनी विचार सुरू करावा, असे मत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले आहे.
नेहरू चौक ते मेहरूण तलावपर्यंतचा गणेश विसर्जन मिरवणुकीचा मार्ग ४.८० किमी अंतराचा आहे. या मार्गावर नेहरू चौक ते जुने गावातील महर्षी दधिची चौकापर्यंत मंडळांना सादरीकरणासाठी संधी मिळते. यावर्षी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या विसर्जन मिरवणुकीत ७२ मंडळांचा सहभाग होता. वेगवेगळे देखावे, सादरीकरण पाहण्यासाठी ७५ ते ८० हजार भाविक येऊन गेले. मिरवणूक संपायला २० तास लागले. शेवटचे विसर्जन शुक्रवारी सकाळी पावणे सहा वाजता झाले. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी व सदस्य, विविध संस्था, संघटना व प्रशासन या सर्वांच्या सहकार्यामुळे सर्व सुरळीत पार पडले. त्यासाठी एक महिना तयारी सुरू होती.
परंतु, विसर्जन मिरवणुकीतील गणेश मंडळांची वाढती संख्या आणि कोर्टाच्या आदेशानुसार, ठराविक वेळेत विसर्जन मिरवणूक संपविण्याचे बंधन लक्षात घेता, सर्वच मंडळांचे समाधान होणे हे आव्हानात्मक बनत चालले आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून उपनगरातील गणेश मंडळांची आणखी एक स्वतंत्र मिरवणूक निघाल्यास मंडळांची संख्या विभागून मिरवणूक संपण्यास लागणारा वेळ कमी होईल. उत्तमात उत्तम नियोजन व सादरीकरणातील स्पर्धा वाढेल, सध्या एकाच भागात होणारी भाविकांची गर्दी दोन ठिकाणी विभागली जाईल. यामुळे प्रशासनावरील ताण कमी होईल, यंत्रणांना नियोजन करणे अधिक सोपे होईल, याचा विचार गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच सुरू करावा. याविषयी पुढील गणेशोत्सवापूर्वी निर्णय घ्यावा, असे मत सचिन नारळे यांनी व्यक्त केले आहे.
उंच मूर्ती नकोत, अडचणी येतात... -
गणेश मंडळांनी पुढील वर्षी उंच गणेशमूर्ती घेणे टाळावे. यावर्षी सर्वाधिक उंचीची मूर्ती २४ फुटांची होती. मेहरुण तलावाची खोली लक्षात घेता १५ फुटांपर्यंतचीच मूर्ती उभी सरळ खाली सोडून विसर्जन करता येणे शक्य होते. त्यापेक्षा उंच मूर्ती आडव्या कराव्या लागतात. यामध्ये नकळतपणे अवमान होण्याची शक्यता आहे, याकडेही नारळे यांनी लक्ष वेधले आहे.
५० टक्के महिलांना संधी द्या... -
पुढच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करताना गणेश मंडळाच्या कार्यकारिणीत ५० टक्के महिलांना संधी देण्यावर मंडळांनी विचार करावा. आता महिला व मुलींचा लक्षणीय सहभाग असलेली केवळ एक ते दोन मंडळे दिसून आली आहेत. ही संख्या वाढायला हवी.