बोदवडला गणेशोत्सव व मोहरम एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 04:20 PM2020-08-21T16:20:31+5:302020-08-21T16:22:14+5:30
शेकडो वर्षांची परंपरा असलेला मोहरम सण तसेच गणेशोत्सवाला सुरवात होत असून, यंदाही दोन्ही सण एकत्र आले आहेत.
गोपाळ व्यास
बोदवड : शेकडो वर्षांची परंपरा असलेला मोहरम सण तसेच गणेशोत्सवाला सुरवात होत असून, यंदाही दोन्ही सण एकत्र आले आहेत.
२२ पासून गणेशोत्सव, तर २७ पासून मोहरमच्या उत्सवाला सुरवात होत आहे. पण यंदा दोन्ही सणांवर कोरोनामुळे विरजण पडले आहे.
शहरात १२० वर्षांची परंपरा मोहरम सणाला आहे. दरवर्षी मोहरमनिमित्त बोदवड शहरात दोनशे वर छडी (सवाऱ्या) बसवण्यात येतात. यात सर्वाधिक हिंदू बांधवांच्या १२० वर तर मुस्लीम बांधवांच्या ८० बसवल्या जातात. यात लाखो रुपयांची उलाढाल होऊन हजारोंना रोजगार मिळत असतो. अनेकांची श्रद्धा असल्याने नवस फेडणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने दरवर्षी बाहेरच्या गावाहून येणाºयांची संख्या अधिक आहे.
गणेशोत्सवही यंदा लॉकडाऊनच्या नियमांत अडकला असून बोदवडला १७ मंडळे तर तालुक्यात ३५ मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे त्यावरही प्रतिबंध लावण्यात आले आहेत. यंदा आगमन तसेच विसर्जन मिरवणुकीला बंदी असून गर्दी तसेच आरास देखावे यावरही प्रतिबंध आहे. बाप्पाच्या आरतीला ही फक्त दोन ते तीन सदस्य असावे. त्यातही सुरक्षित अंतर ठेवावे. या नियमानुसार बाप्पालाही लॉकडाऊन व्हावे लागले.
गेल्या चार दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, तहसीलदार हेमंत पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची बैठक झाली. त्यात सर्व गणेशोत्सव मंडळ तसेच मोहरम कमिटी सदस्य यांना प्रशासने नियम पाळून उत्सव साजरे करण्यावर भर देत नियमावली दिली आहे. या नियमावलीत मोहरम व गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे.