तर डीजे वाजविणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 04:58 PM2019-09-01T16:58:39+5:302019-09-01T17:00:47+5:30
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनि पवन देसले यांनी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
धरणगाव, जि.जळगाव : भक्तीभावाने साजरा होणारा गणेशोत्सवाच्या माध्यमातून मंडळांनी डिजेवर धिंगाणा न करता, समाजप्रबोधनपर डेकोरेशन उभारुन राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वाजविण्यास बंदी असून, पोलीस प्रशासनाने अशा मंडळावर कडक कारवाईचे आदेश दिले आहे. जर एखाद्या मंडळाच्या पदाधिकाºयांनी डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केले तर अशा मंडळावर गुन्हे दाखल करू, असा इशारा सहायक पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिला.
शहरासह तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सपोनि देसले यांनी गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच तालुक्यातील पोलीस पाटील यांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. प्रास्ताविकातून पाळधी औट पोस्टचे सपोनि हनुमंत गायकवाड यांनी पोलीस खात्याची नियमावली स्पष्ट केली.
यावेळी गणेशोत्सवाच्या बैठकीत शहरासह तालुक्यातील ३१ मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पोलीस पाटलांच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष नरेंंद्र पाटील, राजू वालडे यांच्यासह तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. यशस्वीतेसाठी गोपनिय विभागाचे पो.काँ.मिलिंंद सोनार, वैभव बाविस्कर आदींनी परिश्रम घेतले.
आठ डीजे मालकांना नोटिसा
या बैठकीनंतर सपोनि पवन देसले यांनी डीजे व्यवसाय करणाºया आठ मालकांना गणेशोत्सवात डीजे कुठेही वाजवू नये. डीजे वाजवताना आढळल्यास गुन्हे दाखल करू, अशा नोटिसा बजावल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. त्यामुळे डीजे व्यावसायिक धास्तावले आहेत.