कोरोना नष्ट करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचा सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 12:17 PM2020-08-18T12:17:02+5:302020-08-18T12:17:02+5:30

गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन

Ganeshotsav Mandals need to be involved in destroying the corona | कोरोना नष्ट करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचा सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी

कोरोना नष्ट करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांचा सहभाग आवश्यक - जिल्हाधिकारी

googlenewsNext

जळगाव : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. यापुढील काळातही जिल्ह्यातील कोरोनाची महामारी नष्ट करण्यासाठी महामंडळाचा सक्रीय सहभाग आवश्यक असून मंडळांनी आरोग्य विषयक सामाजिक उपक्रमांना मदत करुन येणारा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
सार्वजनिक गणेशोत्सव २०२० ची पूर्वतयारी समन्वय बैठक जिल्हा नियोजन भवनात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे आदी उपस्थित होते.
नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करा
यंदाचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून याबाबत मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन मंडळांनी गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होवू नये याकरीता मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिक व प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम करावे. नागरिकांच्या हितासाठी आणि सुरक्षिततेसाठी मंडळांनी काम करतानाच कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रमात रक्तदान, प्लाझ्मा दान विषयक जनजागृती, रुग्णांना मोफत सकस आहार पुरविणे, घरपोच आरोग्य तपासणी करण्याबरोबरच ग्रामपंचायत स्तरावर किवा प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आॅक्सिजनची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांकरीता तत्काळ आॅक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी आॅक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले.
गणेशोत्सव सुरक्षित व संयमाने साजरा करुया
शासनाच्या मार्गदशक सूचनांचे पालन करुन येणारा गणेशोत्सव साधेपणाने, सुरक्षित व संयमाने साजरा करुया. गणेशमूर्तीची उंची ४ फुटापेक्षा अधिक नको, पूजा व आरतीसाठी ५ पेक्षा अधिक व्यक्ती नको, पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या ठिकाणी गर्दी करु नये, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, आवश्यक त्या परवानग्यांसाठी एक खिडकी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले.
गांभीर्य आणि पावित्र्य राखून गणेशोत्सव साजरा करुया
शासनाच्या नियमांनुसार सार्वजनिक गणेश मंडळांना मंडप उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असल्याने मंडळांनी लवकर अर्ज सादर करावे, सार्वजनिक मंडळांनी विर्सजनाच्या दिवशी घरगुती गणपतींचे दान स्वीकारावे, जेणेकरुन विर्सजनाच्यावेळी होणारी गर्दी टाळता येईल, आगमन व विर्सजन मार्गावर आवश्यक त्या सुविधा महापालिका उपलब्ध करुन देईल, मंडळांनी शासनाच्या नियमांचे गांभीर्य ओळखून व गणेशाचे पावित्र्य राखून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी केले.
आरोग्य उत्सव म्हणून साजरा करणार
कोरोनाच्या महामारीचे सर्वांसमारे आव्हान आहे. चांगल्या सामाजिक उपक्रमांची पूजा मांडून कोरोनाच्या पार्श्वभूीवर साजरा होणारा गणेशोत्सव सर्व मंडळे आरोग्य उत्सव म्हणून साजरा करतील. तसेच शासनाच्या नियमांचे पालन केले जाईल, असे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी सांगितले. यावेळी मुकुंद मेटकर, वैभव पाटील, दीपक जोशी, हेमंत महाजन, सुरेश दायमा यांनीही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.
या बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती सर्वांना सादरीकरणाद्वारे दिली. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार रवी मोरे यांनी मानले.

Web Title: Ganeshotsav Mandals need to be involved in destroying the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव