चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी देवळ्यात केली टोळी तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:15 AM2021-03-15T04:15:41+5:302021-03-15T04:15:41+5:30
दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसापूर्वी पर्दाफाश केला असून त्यातील अतुल नाना पाटील (पथराड, ता.भडगाव), भीमराव ...
दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसापूर्वी पर्दाफाश केला असून त्यातील अतुल नाना पाटील (पथराड, ता.भडगाव), भीमराव रामअवतार प्रसाद व अमजद आरिफ मन्सुरी (दोन्ही रा.देवळा, जि.नाशिक) या तिघांना अटक झालेली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवस पोलीस कोठडी मिळाली. अतुल हा दोन मित्रांना घेऊन जळगाव जिल्ह्यातून दुचाकी चोरून नाशिक जिल्ह्यात सातपुडा परिसरात चोरलेल्या दुचाकी विक्री करत होता. यादरम्यान तिघेही नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील इतर तीन ते चार दुचाकी चोरट्याच्या संपर्कात आले. त्यांच्याशी ओळखी झाल्यावर भडगाव व देवळा तालुक्यातील अशा सर्व दुचाकी चोरणाऱ्या टोळीने जिल्ह्यासह मालेगाव, पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरल्या. विशेष म्हणजे यात नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील तरुणांनीही पहिल्यांदाच दुचाकी चोरी केली असल्याचे समोर आले असून त्यांचे आधीचे कुठलेही गुन्हेगारीचे रेकॉर्ड नसल्याची माहिती मिळाली आहे.
कागदपत्रांबाबत थापा...
पथराड येथील अतुल पाटील गावातील योगेश शिवाजी दाभाडे, जगदीश बाळू शेळके, नीलेश ऊर्फ विक्की पुंडलिक पाटील यांच्या संपर्कात आला. यानंतर चौघांनी जळगाव शहरातील रामानंदगनर पोलीस स्टेशन, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, मालेगाव छावणी, भोसरी, या ठिकाणाहून दुचाकी चोरल्या. चोरीच्या दुचाकी घेऊन ते नाशिक जिल्ह्यात सातपुडा परिसरात गेले. या ठिकाणी त्यांनी अवघ्या १५ ते २० हजारात या दुचाकी विक्री केल्या. याचदरम्यान या अतुलच्या टोळीची भीमराव रामअवतार प्रसाद, अमजद आरिफ मन्सुरी यांच्यासह इतरांशी ओळखी झाली. अतुल त्याच्या मित्रासह दुचाकी चोरून विक्रीसाठी देवळा येथील भीमराव प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करीत होता. यानंतर आलेले पैसे वाटून घेत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दुचाकी विक्री करतेवेळी काही दिवसात कागदपत्रे आणून देतो. म्हणून सांगायचे, मात्र एकदाचे पैसे मिळाले की त्यांच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नव्हते.