मराठा समाज आरक्षण सभांमध्ये पाकीटमारी करणारी टोळी जेरबंद, मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्याचा करायचे पाठलाग
By विलास बारी | Published: December 6, 2023 11:35 PM2023-12-06T23:35:22+5:302023-12-06T23:35:45+5:30
दरम्यान, राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी या गँगनेच चोरी केल्याचा संशय असून अटक केलेल्या पाच जणांकडून अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.
जळगाव : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताफ्याचा पाठलाग करीत त्यांच्या सभांमधून मोबाईल, पाकीट, सोनपोत चोरी करणाऱ्या मालेगावच्या गँगला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख एक लाख रुपयांसह एक चारचाकी, आठ मोबाईल हस्तगत करण्यात आले. दरम्यान, राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणी या गँगनेच चोरी केल्याचा संशय असून अटक केलेल्या पाच जणांकडून अधिक माहिती समोर येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिली.
अटक केलेल्या या गँगविषयी माहिती देण्यासाठी बुधवार, ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी त्यांनी सांगितले की, जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी तसेच धुळे येथेही मनोज जरांगे पाटील यांच्या सभा झाल्या. अशा सभांमध्ये चोरट्यांनी मोबाईल, पाकीट, सोनपोत लांबविल्या. यात जळगाव पोलिसांनी अगोदरच्या सभांमधील काही फुटेजचा आधार घेत चोरट्यांचा शोध सुरु केला. त्यानुसार काही जण पोलिसांच्या नजरेस पडले व त्यांनी मालेगाव येथील अबू बक्कर उर्फ अबू कबूतर (३५) या गॅंग प्रमुखासह पाच जणांना अटक केल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितले.
मोठा मुद्देमाल जप्त
मालेगाव येथील पाच जणांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोऱ्यांची कबुली देत एक लाख ८० हजार रुपये रोख, एक चार चाकी वाहन, आठ मोबाईल त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले.
हुबेहुब पेहराव
मनोज जरांगे पाटील यांच्या सभा ज्या ठिकाणी व्हायच्या त्या ठिकाणी जाणाऱ्या त्यांच्या ताफ्याच्या मागे ही गँग जात असे. विशेष म्हणजे या ताफ्यातील मंडळींसारखाच पेहराव ही गँग करून गर्दीचा फायदा घेत चोरी करत असे.
राज्यातील चोऱ्याही होणार उघड
मनोज जरांगे पाटील यांच्या सभा ज्या-ज्या ठिकाणी झाल्या त्या ठिकाणच्या पोलिस ठाण्यांमध्ये या गँगविषयी माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे राज्यात ज्या-ज्या ठिकाणी सभा झाल्या तेथील ज्या काही चोऱ्या झाल्या असतील त्या उघड होण्यास यामुळे मदत होणार असल्याचा विश्वास पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केला.