मुलाचा शोध घेत असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, दोघे ताब्यात
By admin | Published: January 23, 2017 08:54 PM2017-01-23T20:54:52+5:302017-01-23T20:54:52+5:30
उशीर झाला म्हणून घरी न आलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी विवेकानंदनगरातील उद्यानाकडे गेलेल्या ४५ वर्षीय
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 23 - उशीर झाला म्हणून घरी न आलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी विवेकानंदनगरातील उद्यानाकडे गेलेल्या ४५ वर्षीय महिलेवर रविवारी रात्री पावणे बारा वाजता दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली. या घटनेनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी राहूल पारसनाथ उमाप (वय २३ रा.कंजरवाडा, जळगाव) व दीपक सुभाष गायकवाड (वय २७ रा.वरणगाव, ता.भुसावळ) या दोघांना ताब्यात घेतले.
पीडित महिलेचा मोठा मुलगा रविवारी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्याला शोधण्यासाठी पीडित महिला विवेकानंदनगरातील उद्यानाकडे गेली असता रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास रस्त्यावर चार अनोळखी मुले थांबलेली होती. त्यांना मुलाच्या बाबतीत विचारणा केली असता तुमचा मुलगा उद्यानाकडे गेला असल्याचे सांगितले, त्यानुसार पीडित महिला तिकडे गेली असता त्यातील दोन्ही मुलांनी त्यांचा पाठलाग केला. पुढे पायवाटेवर पीडित महिलेला ओढून तोंड दाबून दोघांनी बलात्कार केला. त्यानंतर पीडित महिलेचा ओळखीचा व्यक्ती आल्याने त्या नराधमांनी तेथून पळ काढला.
लग्नासाठी आला अन् कोठडीत अडकला
झाल्याप्रकाराची माहिती पीडित महिलेने घरी पती व मुलांना दिल्यानंतर त्यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठले. तेथे दोन्ही संशयितांचे वर्णन सांगितले, त्यानुसार उपनिरीक्षक गिरधर निकम, भटू नेरकर, छगन तायडे, भास्कर पाटील यांनी लागलीच परिसरात संशयिंतांचा शोध घेतला असता या परिसरात लग्न असल्याने तेथे अशा वर्णनाचे तरुण असल्याचे समजले. त्यानुसार रात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी राहूल व दीपक याला ताब्यात घेतले. दरम्यान, दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. दीपक हा मित्राच्या भावाच्या बहिणीच्या लग्नासाठी वरणगाव येथून आला होता. या दोघांनी रात्री मोबाईलमध्ये अश्लील क्लीप पाहिली व त्यानंतर हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
सलग दुसरी घटना
राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखाली एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर दोन विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना शनिवारी भुसावळात घडली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.