जळगावात चोऱ्या करणारी महिलांची टोळी सक्रीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:46 PM2018-04-18T12:46:28+5:302018-04-18T12:46:28+5:30
एमआयडीसीत उद्योजक हैराण
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १८ -एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये चोरीचे प्रकार वाढले असून वेगवेगळ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. सेक्टर एन-६८ मधील कॅपोज एन्टरप्रायजेस या प्लॅस्टीक ग्रॅन्युअल (दाणा) कंपनीतून प्लॅस्टीक रॉ मटेरियल व प्लॅस्टीक स्क्रॅप मटेरियलच्या गोण्या चोरताना तर दोन महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या आहेत. या महिलांची एक टोळी कार्यरत आहे.
कॅपोज एन्टरप्रायजेस या प्लॅस्टीक ग्रॅन्युअल (दाणा) कंपनीतून दोन वेळा रॉ मटेरियलची चोरी झाली आहे. दोन्ही वेळा या दोन्ही महिला सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्या आहेत. त्यांच्याविरुध्द सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील दिगंबर कपोते यांच्या मालकीची ही कंपनी आहे.
९ एप्रिल रोजी पहाटे चार ते साडे चार वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली आहे. १५ हजार रुपये किमतीच्या ६५ किलो वजनाच्या रॉ मटेरियल असलेल्या सात गोण्या लांबविण्यात आल्या तर त्याआधी ३ फेब्रुवारी रोजी पाच हजार रुपये किमतीच्या १५ किलो वजनाच्या स्क्रॅम मटेरियलच्या १० गोण्या लांबविण्यात आल्या. या दोन्ही महिला भींतीवरुन उडी मारताना दिसत आहेत.
एका घटनेत अनेकांचा सहभाग
चोरीच्या घटनेत महिला टोळीसह काही पुरुषांचाही सहभाग आहे. एमआयडीसी रात्री व दिवसाची गस्त राबवावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.
महिन्याकाठी लाखोचा माल चोरी
प्लास्टीक, दालमिल असो कीअन्य कोणती कंपनी त्यातून महिला टोळीकडून महिन्याकाठी लाखो रुपयाचा माल चोरी होत आहे. शनिवारी वीज पुरवठा बंद राहत असल्याने कंपन्याही बंद राहतात, त्यामुळे याच दिवशी चोरीच्या घटना जास्त घडतात. पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यानंतर कागदावर अर्ज घेतला जातो, गुन्हा दाखल केला जात नाही. सततचा तगादा किंवा दबावतंत्र वापरले तरच गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.