गंगापुरी ग्रामस्थांचा मतदानावरील बहिष्कार मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 08:51 PM2019-10-18T20:51:15+5:302019-10-18T20:51:21+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन : बैठकीत निर्णय, स्थलांतर होऊ शकते
जामनेर : पुनर्वसन होत नाही तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा गंगापुरी, ता.जामनेर येथील ग्रामस्थांनी घेतला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाने याची गंभीर दाखल घेतली. जिल्हाधिकारी यांनी विशेष बाब म्हणून पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
तहसीलदार अरुण शेवाळे, गटविकास अधिकारी अजय जोशी, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी गंगापुरी येथे जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारी ऐकून घेतल्या.
ग्रामस्थांशी झालेल्या चर्चेचा अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात येणार आहे. गावातील बेघर नागरिकांना देखील शासकीय जागेत सामावून घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सुमारे बाराशे लोकसंख्या असलेले गंगापुरी गाव जामनेर-भुसावळ रस्त्यावर सूर नदी काठावर वसलेले आहे. वाघूरच्या बॅकवॉटरचा तिन्ही बाजूंनी गावाला विळखा पडलेला असल्याने जीवन जगणे अवघड झाले आहे. पुनर्वसनाची मागणी गेल्या १० वर्षांपासून केली जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी व शाशनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता.
अधिका-यांनी सुचविला पर्याय
ग्रामपंचायत अंतर्गत उपलब्ध असलेल्या शासकीय जागेवर ग्रामस्थांच्या सोयीने तसेच त्यांच्या मागणीनुसार स्थलांतर करता येऊ शकते, असा पर्याय यावेळी अधिका?्यांनी सुचविला. या बैठकीमुळे ग्रमस्थांना दिलासा मिळाला आहे.