बनावट आधारकार्ड, पॅनकार्डचा वापर करुन लोकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:12 AM2021-06-22T04:12:54+5:302021-06-22T04:12:54+5:30

विकास कपूर व त्याच्या सहकाऱ्यांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून वामन काशिराम महाजन (रा.अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) या शेतकऱ्याला १ कोटी ...

Gangs using fake Aadhaar card, PAN card | बनावट आधारकार्ड, पॅनकार्डचा वापर करुन लोकांना गंडा

बनावट आधारकार्ड, पॅनकार्डचा वापर करुन लोकांना गंडा

Next

विकास कपूर व त्याच्या सहकाऱ्यांनी पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून वामन काशिराम महाजन (रा.अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर) या शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला होता. सायबर पोलिसांनी गेल्या आठवड्यात त्याच्या मुसक्या आवळल्या. सध्या तो २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, उपनिरीक्षक संदीप पाटील, दिलीप चिंचोले, नितीन सपकाळे, गौरव पाटील, दिनेश पाटील व वसीम शेख यांचे पथक दिल्लीत दाखल झाले आहे. दोन पथकात त्याची अधिकारी व कर्मचाऱ्यांची विभागणी करण्यात आली आहे. हिरे यांच्या पथकाने मुख्य आरोपी विकास कपूर याची घरझडती घेऊन लॅपटॉप जप्त केले.

गच्चीवरुन पळून जाताना पकडले

विकास कपूर याला अटक झाल्यामुळे इतर साथीदार सावध झाले होते. जळगाव पोलीस घरी पोहचल्याचे समजताच वरच्या मजल्यावर असलेला सचिन गुप्ता गच्चीवर पळाला. उपनिरीक्षक संदीप पाटील, दिलीप चिंचोले व नितीन सपकाळे यांनी गच्ची गाठली. तेथून पलायन करण्याच्या तयारीत असताना तिघांनी त्याला घेरुन ताब्यात घेतले. काही सेंकद विलंब झाला असता तर गुप्ता हाती लागला नसता.

हरियाणात ९६ लाखाचा गंडा

कपूर टोळीने जळगावप्रमाणेच हरियाणातही एका व्यक्तीला अशाच पध्दतीचे आमिष दाखवून ९७ लाखाचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती. वामन महाजन यांच्याशी संपर्क साधून त्याने तुमच्या विम्याचे व्याज एजंटला मिळत आहे, तुम्हाला मिळत नाही. तुम्हाला मिळवून देतो असे सांगून जाळ्यात ओढले.

गुन्हा दाखल झाल्यानंतरही ३० हजार भरले

आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर महाजन यांनी कपूर याच्या खात्यावर ३० हजार रुपये भरले. तुम्हाला संपूर्ण पैसे परत मिळतील, असे सांगून व्हॉटसॲपवर महाजन यांच्या नावाने तयार केलेले धनादेश पाठविले. त्यासाठी आरटीजीएस व इतर प्रोसेसिंगसाठी ३० हजार रुपये पाठवावे लागतील असे कपूर याने महाजन यांना सांगितले. आता खरच पैसे मिळतील या आशेने त्यांनी पुन्हा पैसे पाठविले. ३० हजार रुपये गेले पण तेथेच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तंत्रज्ञानाचा वापर करुन त्याची कुंडलीच पोलिसांच्या हाती लागली.

Web Title: Gangs using fake Aadhaar card, PAN card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.