जळगाव - औरंगाबाद मार्गावर गॅस सिलिंडर्सचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 01:41 AM2017-08-06T01:41:17+5:302017-08-06T01:41:27+5:30
गॅस सिलिंडर वाहून नेणा-या ट्रकमध्ये स्पार्कींग झाल्याने सिलिंडर्सचे एका पाठोपाठ एक असे प्रचंड स्फोट झाले आणि या आवाजामुळे वाकोद परिसर हादरुन गेला.
जळगाव : गॅस सिलिंडर वाहून नेणा-या ट्रकमध्ये स्पार्कींग झाल्याने सिलिंडर्सचे एका पाठोपाठ एक असे प्रचंड स्फोट झाले आणि या आवाजामुळे वाकोद परिसर हादरुन गेला. जळगाव-औरंगाबाद महामार्गावर वाकोद (ता. जामनेर) नजीक शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. आग इतकी प्रचंड होती की, मध्यरात्रीनंतर एक वाजेनंतरही आगीचे लोळ सुरुच होते. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही.
आगीच्या भीतीमुळे १५ हजार लोकवस्तीचे वाकोद गाव खाली करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडर भरलेली एक ट्रक जळगावहून औरंगाबादकडे जात होती. ही ट्रक वाकोद गावाजवळील साई पेट्रोलपंपानजिक आली असता स्पार्र्कींगमुळे ट्रकच्या कॅबिनमधून धूर निघत असल्याचे ट्रकचालकाच्या लक्षात आले. चालकाने जवळच असलेल्या पेट्रोलपंपावरील अग्निरोधक यंत्र मागविले. त्याआधारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत असतानाच ट्रकच्या डिझेलच्या टाकीचा अचानक स्फोट झाला आणि ट्रकमधील गॅस भरलेल्या सिलिंडर्सचे स्फोट होऊ लागले. सिलिंडर्सचे एकामागून एक स्फोट होत असल्याने परिसरात प्रचंड आवाज येऊ लागला. साधारण १०० ते १५० फूट अंतरावर हे सिलिंडर्स हवेत उडत होते. परिसरातील लोक आवाजामुळे हादररुन गेले. आगीत ट्रक जळून खाक झाला आहे.
जामनेर, जळगाव, एरंडोल तसेच सिल्लोड पालिकांचे अग्निशमन बंब मागविण्यात आले. यासोबतच जैन फॉर्म हाऊसमधूनही पाण्याचा टँकर मागविण्यात आला. त्याद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु होते. तसेच काही शेतकºयांकडे असलेले पाण्याचे टँकरही घटनास्थळी पोहचविण्यात येत होते.
या घटनेमुळे जळगाव- औरंगाबाद महामार्गावरील दोन्ही बाजूंकडील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रशासनाने सहा रुग्णवाहिका तिथे तयार ठेवल्या आहेत.
रात्री १ वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले पण त्यानंतर लागलीच स्फोट झाल्याने लोकांमध्ये पुन्हा भीती पसरली होती. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली.
जळगावहून अग्निशामक बंब पाठविण्यात आले आहेत. महसूल आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहचली आहे. आम्ही यंत्रणेच्या संपर्कात आहोत. यात कुणीही जखमी झालेले नाही.
- किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी, जळगाव