जळगावात गॅस सिलिंडर ७०० रुपयांच्या उंबरठ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 12:05 PM2019-12-05T12:05:12+5:302019-12-05T12:05:48+5:30
घरगुती सिलिंडर १३ रुपयांनी महागले
जळगाव : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किंमती गेल्या चार महिन्यांपासून सतत वाढत असून आतादेखील घरगुती सिलिंडरच्या किंमतीत १३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता जळगावकरांना एका घरगुतीसाठी सिलिंडरसाठी ६९५.५० मोजावे लागणार आहे. ७०० रुपयांच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या या सिलिंडरच्या किंमतीत चार महिन्यात तब्बल ११८.५० रुपयांनी वाढ झाली आहे.
६८२.५० वरून ६९५.५० वर किंमत
दरवाढ होण्यापूर्वी जळगावात घरगुती सिलिंडरची (१४ किलो) किंमत ६८२.५० रुपये होती. त्यात डिसेंबर महिन्यात १३ रुपयांची वाढ होऊन सिलिंडरची किंमत आता ६९५.५० रुपयांवर पोहचली आहे.
सलग भाववाढीने गणित कोलमडतेय
सप्टेंबर महिन्यापासून गॅस सिलिंडरच्या किंमतीत सतत वाढ होत आहे. यामध्ये आॅगस्ट महिन्यात ५७७ रुपयांवर असलेल्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत सप्टेंबर महिन्यात १५.५० रुपयांनी वाढ होऊन ते ५९२.५० रुपयांवर पोहचले. त्यानंतर पुन्हा आॅक्टोबर महिन्यात १२.५० रुपयांनी वाढ होऊन सिलिंडरच्या किंमतीने ६०० रुपयांचा पल्ला ओलांडून ते ६०५ रुपयांवर पोहचले. ही वाढ अशीच सुरू राहून नोव्हेंबर महिन्यात तर थेट ७७.५० रुपयांची वाढ होऊन सिलिंडर ६८२.५० रुपयांवर पोहचले. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा वाढ होऊन सिलिंडरच्या किंमती १३ रुपयांनी वधारल्या व सिलिंडर ६९५.५० रुपयांवर पोहतच ते ७०० रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या सिलिंडरच्या या वाढत्या किंमतीने गृहिनींचे ‘बजेट’ कोलमडत आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत २९७ रुपयांनी वाढ
घरगुती सिलिंडर सोबतच व्यावसायिक सिलिंडच्या किंमतीतही वाढ होत असून चार महिन्यात हे सिलिंडर २९७ रुपयांनी महाग झाले आहे. आॅगस्ट महिन्यात ९३०.५० रुपयांवर असलेल्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत सप्टेंबर महिन्यात १४५.५० रुपयांनी वाढ होऊन ते १०७६ रुपयांवर पोहचले. त्यानंतर मात्र आॅक्टोबर महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या बाबतीत ग्राहकांना दिलासा मिळाला. कारण या महिन्यात या सिलिंडरच्या किंमती ७१.५० रुपयांनी कमी होऊन सिलिंडर १००५ रुपयांवर आले. त्यानंतर मात्र नोव्हेंबर महिन्यात थेट २१४.५० रुपये अशी प्रती सिलिंडर भरमसाठ वाढ होऊन हे सिलिंडर १२१९.५० रुपयांवर पोहचले. डिसेंबर महिन्यातही दरवाढ कायम राहून आठ रुपयांची वाढ होऊन व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती १२२७.५० रुपयांवर पोहचल्या.
नोव्हेंबर महिन्यात ६८२.५० रुपयांना घरगुती सिलिंडर मिळत होते, आता त्याची किंमत ६९५.५० रुपये झाली आहे.
- अजय ठोंबरे, व्यवस्थापक गॅस एजन्सी.