दापोरा बंधाऱ्याचे दरवाजे उघडे असल्याने पाणी जातेय वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:17 AM2021-04-20T04:17:01+5:302021-04-20T04:17:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात आले असले तरी याचा दापोरासह परिसरातील गावांना लाभ होणार नसल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गिरणा धरणातून आवर्तन सोडण्यात आले असले तरी याचा दापोरासह परिसरातील गावांना लाभ होणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दापोरा बंधाऱ्याचे दरवाजे उघडे असल्याने संपूर्ण पाणी वाया जात आहे. यामध्ये बंधाऱ्यालगत असलेल्या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने बांधाऱ्याचे दरवाजे उघडल्याचा आरोप केला जात आहे. मात्र त्याचा ठेकेदाराने इन्कार केला आहे.
गेल्या आठवड्यात गिरणा धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आले. हे आवर्तन दापोरा बंधाऱ्यापर्यंत पोहचून बंधारा पूर्ण भरेल अशी अपेक्षा परिसरात व्यक्त केली जात होती. मात्र बंधाऱ्याचे दरवाजे उघडे असल्याने हे पाणी वाहून जात आहे. याविषयी परिसरातील ग्रामस्थांनी या बंधाऱ्यालगत काम करणाऱ्या ठेकेदारावर आरोप करीत त्यांनीच दरवाजे उघडले असल्याचा आरोप केला आहे. दापोरा बंधाऱ्यानजीक लमांजन रस्त्यावरील कुरखून नाल्यावर पुलाचे काम मंजूर झाले आहे. त्या कामास सुरुवात झाली. मात्र तिथपर्यंत बंधाराच्या पाण्याचा प्रवाह आल्यास कामात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे ठेकेदाराने बंधाऱ्याचे दरवाजे उघडले असल्याचा आरोप केला जात आहे.
याविषयी पुलाचे काम करणारे ठेकेदार राहुल महाजन यांनी सांगितले की, बंधाऱ्याचे दरवाजे पूर्वीपासूनच उघडे आहे. त्यामुळे बंधाऱ्यात पाणी राहावे म्हणून आपण स्वतः दापोरा येथील ग्रामस्थांना बोलवून बंधाऱ्याच्या ठिकाणी पाट्या लावल्या. याविषयी ग्रामपंचायतकडे आपण मागणी करीत पाण्याची पातळी कमी करण्याविषयी कळविले आहे. तसे झाल्यास पुलाचे काम होऊ शकेल व याचा ग्रामस्थांना देखील दळणवळणासाठी फायदा होईल. हा विषय मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडण्यात येणार असून ते जे सुचवणार आहे ते मान्य राहणार असल्याचे ठेकेदार राहुल महाजन यांनी सांगितले.
पाणी योजनांचे पाणी जातेय वाया
दापोरा बंधाऱ्यावर शिरसोली प्र.न., शिरसोली प्र.बो. या मोठ्या गावांसह दापोरा, दापोरी, लमांजन, खर्ची रिंगणगाव, सावदा या गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा अवलंबून आहे. सोबतच परिसरातील बागायती क्षेत्राला या बंधाऱ्यातील पाण्याचा लाभ होतो. त्यामुळे हे पाणी तिथेच अडविले जावे अशी मागणी केली जात आहे. आवर्तन वाया जात असले तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.