सोनपावलांनी आली गौरी, जळगावात गौरींची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:31 PM2018-09-16T12:31:09+5:302018-09-16T12:33:03+5:30
चैतन्यमय हर्षोल्हासात स्वागत
जळगाव : मंगलमय ध्वनीत गौर आली गौर सोनपावलांनी असा जयघोष करीत ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचे चैतन्यमय हर्षोल्हासात शनिवारी घरोघरी स्थापना करण्यात आली़
गणरायाच्या आगमनानंतर सुख-समृध्दी व मांगल्यांसह वैभवाचे प्रतिक असलेल्या तीन दिवसीय गौरी उत्सवाला प्रारंभ झाला़ सकाळपासून घरोघरी गौरी आवाहनाची लगबग सुरू होती़
अंगणात सडा संमार्जन, रांगोळी काढण्यात येऊन गौरींचे स्वागत करण्यात आले. अंगणपासून घरात येईपर्यंत हळद-कुंकू पाऊले काढून गौर आली गौर सोनपावलांनी आली असे म्हणून आगमन झाले़
पारंपरिक ज्येष्ठा, कनिष्ठा गौरींचे भरजरी साड्या, अलंकाराचा साज व दागिने गौरीला अर्पण करुन सजविण्यात आले होते़ अनेक ठिकाणी मंत्रजागरण शांतीपाठाचा कार्यक्रम झाला़
महानैवेद्य
अनुराधा नक्षत्रावर आवाहन, १६ रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व महानैवेद्य अर्पण करुन १७ रोजी मूळ नक्षत्रावर देवीचे विसर्जन करण्यात येते़ रविवारी गौरींना महानैवेद्य अर्पण करण्यात येईल़ त्यात १६ भाज्यांचा समावेश असतो़ मिष्ठान्नासह महानैवेद्य अर्पण केला जातो़ त्यात आंबील यास अनन्य महत्व आहे़ ज्वारीचे पीठापासून ते तयार करण्यात येते़