गावठी पिस्तूल दाखवून दहशत, संशयित जेरबंद
By विजय.सैतवाल | Published: February 19, 2024 05:00 PM2024-02-19T17:00:23+5:302024-02-19T17:01:28+5:30
काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात ईश्वर पारधी हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली.
जळगाव : बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तूल घेऊन दहशत पसरवणाऱ्या ईश्वर रामा पारधी (२३, रा. धानोरा बुद्रुक, ता. जळगाव) याला शनिपेठ पोलिसांनी अटक करून पाच हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल हस्तगत केले. त्याच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार, १८ फेब्रुवारी रोजी रात्री करण्यात आली.
काशीबाई उखाजी कोल्हे शाळेच्या पाठीमागील भागात ईश्वर पारधी हातात गावठी पिस्तूल घेऊन परिसरात दहशत पसरवत असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ईश्वर पारधी हा आरडाओरड करून दहशत पसरवत होता. पोलिसांना पाहून त्याने पळ काढला. मात्र पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या याप्रकरणी पोकॉ राहुल पाटील यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ईश्वर पारधी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहेत.