गावरान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 02:38 PM2018-11-30T14:38:53+5:302018-11-30T14:39:13+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘गाव पांढरी’ या सदरात साहित्यिक रवींद्र पांढरे लिहिताहेत...
बय सांगत होती, ‘गावरान तं् गावरानच राह्यतं भाऊ. अन् तुल्हे सांगू ह्या गावरानची एवढी ख्याती काहून झाली ! काहून की हे जे हायब्रीड आलं न्ं ते निकस हाये.
‘गावरान’ निकस हाये तं् हाये ते खाल्लं की, जे कधी पाह्यले नही, ऐकले नही आसे नवे नवे आजार उमळ्याले लागले भाऊ. म्हणून आता लोकं म्हन्याले लागले, गावरान पाह्यजे, गावरान पाह्यजे. तसं तं् हे हायब्रीड याच्याबी आधी ह्या ‘गावरान’ले ख्याती मिळेल व्हती ती गावरानी तुपानं. काय तुप राहे भाऊ गावरानी. कणीदार, रवाळ, पिवळं धम्मक. घमघम वास ये येचा. डोळ्यात घातलं त् डोळे चमकदार अन् नजर तेज व्हये मानसाची. गाई, म्हशीले खायालेबी तसंच भेटे भाऊ. शेंगदाण्याची सरकीची ढेप खात गाई, म्हशी. तेच्यानं दुधबी तसंच निघे, कपाळाले लाव्याच्या गंधकावानी घट. मडक्यात दही लावलं तं आसं दहि लागे, खापची खाप. लोनी काढ्याले रई लावली तं् खरंडीग ताक तं् फुकट वाटून देत गल्लीत घरोघरी. आता रई लावनारी बाई म्हनली तं् एकच दिसते भाऊ, बाळक्रिस्राची माय यशोदा, तेबी चित्रात.
आता पह्यल्यावानी गावरानी तुप भेटत कां भाऊ. पह्यल्या जमान्यातलं गावरानी तुप म्हनशील तं् औषीद व्हत भाऊ औषीद. गावरानी तुप खानारं मानुस कसं तिपीतिपी तळपे, सोन्यावानी पिवळ धम्मक.
‘आता काय राह्यलं रे भाऊ गावरानी. गावरानी आंबा तं् डोळ्यानं दिसत नही भाऊ. किती गावरानी आंबे व्हते भाऊ आमच्या जमान्यात. बाया मानसं, पोरंसोरं इकळून जात आंबे खाऊ खाऊ.
झाडच तसे व्हते भाऊ आंब्याचे शिवारात. झाडं तं् झाडं पन ‘आमराया’ बी तशाच व्हत्या मोठ्या-मोठ्या दहा-दहा, वीस-वीस झाडांच्या आंब्याचे झाडं अन् आमराया म्हनशील तं् वैभव व्हतं भाऊ शिवारच. हे मोठमोठे झाडं, पन्नास पन्नास-साठ साठ वर्साचे एका आंब्याच्या सावलीतच आख्ख गव्हार बसे गाई वासराचं वावरात काही इहिरीच्या पान्याची शांती कऱ्याची आसली म्हना, कां काही नवस आसला म्हना तं् सयपाक पानी, जेवनं खावनं समदं आमराईच्या सावलीत उरके. आताच्यावानी कापडी मांडव घाल्याचं काम पडेना.
आंबे कां आंबे व्हते भाऊ गावरानी. एकापेक्षा एक नामी.
नगदीला केळ्या, देवळीतला काळ्या, मळ्यातला रोपड्या अन् सांगवीची कुयरी.
एकापेक्षा एक नामी आंबे गवताच्या आढीत पिकोयेल आंब्याचा रस म्हनशील नं् तं् आसा लालजरद हि गुळावानी. घटब्बी तसाच.
आमरसाचं जेवन म्हनलं तं् थोरामोठ्यांची मेजवानी व्हती. बाया शेजारनी पाजारीले छाती फुगावून कौतुकानं सांगत, इहिनच्या घरी गेल्ही व्हती तं् इहिननं् मले आमरसाचं जेवन केल्हं. ‘आता ते आढीतले पिकोयेल गावरान आंबेबी राह्यले नही अन् तो जिव्हाळाबी. आता पैशा करता लोकं ते निलमी कलमी आंबे कवळे काचेच तोडता अन् औषीदं टाकून पिकवता. त्या आंब्याच्या रसाले ना रंग ना ढंग. नही खाल्लं तेवढं चांगल.
गावरान काही राह्यलं नही भाऊ आता. बारा मह्यन्याचा खार घाल्याचा म्हनलं त् खार घाल्याले बी गावरान आंबा भेटत नही. बजारात कधी इचारलं की, ‘गावरान हाये कां रे भाऊ, तं् म्हनता, गावरान काय राह्यलं बय आता, गेल्हा तो तुमचा गावरानचा जमाना, आता हा हायब्रीडचा जमाना हाये.
-रवींद्र पांढरे, पहूर पेठ, ता.जामनेर, जि.जळगाव