चोपडा येथे तिघांकडून गावठी कट्टा हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 11:03 PM2020-12-10T23:03:36+5:302020-12-10T23:05:22+5:30
चुंचाळे ते चौगाव रोडवर विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तीनजणांना चोपडा पोलिसांनी रंगेहात पकडत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चोपडा : शहराचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, १० रोजी चोपडा शिवारातील चुंचाळे ते चौगाव रोडवर विना परवाना गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यातील तीनजणांना चोपडा पोलिसांनी रंगेहात पकडत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दि १० रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास चोपडा शिवारातील चुंचाळे ते चौगाव रस्त्यावर चारचाकी (एमएच ५०/ए-०८०७) ही येताना चोपडा पोलिसांनी सापळा रचून थांबवली. त्यातील सांगली जिल्ह्यातील संदीप आनंदा निकम (२८, बुधगाव, ता. मिरज), विशाल गणेश कांबळे (२६, माधवनगर, ता. मिरज), प्रदीप अरुण साबळे (३५, माधवनगर, ता. मिरज) या तीन इसमांची झडती घेतली असता ३० हजार किंमतीची गावठी बनावटीचा एक कट्टा, ३ हजार रूपये किमतीचे तीन जिवंत काडतुसे, ३ लाख रूपये किंमतीची कब्जातील चारचाकी वाहन व १३ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल हँडसेट असा एकूण ३ लाख ४६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. तिघांना चोपडा शहर पोलीस स्टेशनला अटक करण्यात आली.
शहर पोलिस स्टेशनचे पो. कॉ. मिलिंद सपकाळे यांच्या फिर्यादीवरून संदीप निकम, विशाल कांबळे, प्रदीप साबळे यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, ५, २५(१) (अ) यासह भादंवि ३४, म. पो. कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई चोपडा शहरचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोदकुमार जगदेव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित सावळे, पोउपनि रामेश्वर तुरनर, पोहेकॉ सुनील पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, शेषराव तोरे, विलेश सोनवणे, जयदीप राजपूत, पोकॉ मिलिंद सपकाळे, प्रकाश मथुरे, योगेश शिंदे, सुभाष सपकाळ, लव सोनवणे, सुमेर वाघेर यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोना संतोष पारधी हे करत आहेत.