चैनीच्या वस्तुंची आॅर्डर घेऊन घरफोडी करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:11 PM2019-10-18T13:11:32+5:302019-10-18T13:12:00+5:30
दोन डझन घरफोड्यांची पोलिसात नोंद
जळगाव : टी.व्ही., एलईडी व मोबाईल यासारख्या चैनीच्या वस्तूंची ग्राहकांकडून आॅर्डर घेऊन घरफोडी करणाऱ्या प्रमोद देवेंद्र इंगळे (३६, रा. चिखली, जि.बुलडाणा) या अट्टल चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या चिखली या मुळ गावातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून दोन एलईडी जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, प्रमोद याच्यावर जळगाव व बुलडाणा जिल्ह्यात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी सारखे २४ गुन्हे दाखल आहेत.
भुसावळ येथे दोन घरफोडीच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या चौकशीत प्रमोद इंगळे हा निष्पन्न झाला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी सहायक फौजदार राजेंद्र पाटील, हवालदार विजय देवराम पाटील, अनिल इंगळे, सुरेश महाजन, संतोष मायकल, नरेंद्र वारुळे, रमेश चौधरी, दिनेश बडगुजर, मिलिंद सोनवणे व मुरलीधर बारी यांचे पथक तयार केले होते. या पथकाने भुसावळ, बुलढाणा, अकोला येथे प्रमोदचा शोध घेत असताना तो मुळ गावी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सकाळीच त्याच्या घरी मुसक्या आवळण्यात आल्या.
कमी किमतीत द्यायचा वस्तू
प्रमोद याने ज्या वस्तूची आॅर्डर घेतली, ती वस्तू तो घरफोडी किंवा चोरी करुन आणायचा.संबंधित व्यक्तीला निम्मे किमतीत किंवा त्यापेक्षाही कमी किमतीत वस्तू विक्री करायचा. भुसावळ शहरात दोन घरफोडी केल्यानंतर तेथील एलईडी घरातच सापडल्या. अटक केल्यानंतर त्याला भुसावळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. भुसावळातून टीव्ही, एलईडी व मोबाईल चोरी झाल्या होत्या. त्याच गुन्ह्याचा तपास करीत असताना प्रमोद निष्पन्न झाला.
हद्दपार बुलडाण्यातून, चोºया जळगावात
प्रमोद याला बुलडाणा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे त्याने जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य केले. बंद घरांची टेहाळणी केल्यानंतर चोरी व घरफोडी करण्याचा उद्योग तो करीत असायचा. विशेष म्हणजे त्याच्यासोबत कोणीही नाही, एकटाच घरफोड्या करुन रातोरात ते शहर सोडून इतत्र निघून जात असे. दरम्यान, २४ घरफोड्यांची त्याने कबुली दिलेली आहे.