आंदोलनांमुळे गाजला दिवस
By admin | Published: June 2, 2017 12:53 AM2017-06-02T00:53:06+5:302017-06-02T00:53:06+5:30
अमळनेर/चोपडा : शेतकरी कामगार व कृती समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन
अमळनेर/चोपडा : पीक कर्ज मिळत नाही, किसान कार्ड मिळत नसल्याने, शेतकरी कामगार पक्षातर्फे अमळनेर कृउबातर्फे रास्ता रोको करून सायंकाळी जिल्हा बॅँकेच्या कर्ज शाखेला कुलूप ठोकण्यात आले. तर शिवसेनेतर्फे बंद एटीएम मशीनला हार घालून बॅँकेच्या व्यवस्थापकांनाही पुष्पहार घालत गांधीगिरी करीत एटीएम मशीनमध्ये पैसे टाकण्याची विनंती केली. चोपडय़ात शेतकरी कृती समितीतर्फे रास्ता रोको करण्यात आले. विविध आंदोलनांमुळे आजचा दिवस गाजला.
अमळनेर
जून महिना सुरू झाला तरी कर्ज देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, एटीएम कार्ड मिळाले नाही, त्यामुळे संतप्त शेतक:यांनी आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास धुळे रस्त्यावर कृउबासमोर रास्ता रोको आंदोलन केले. शेतकरी कामगार पक्षाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शिवाजी दौलत पाटील यांनी केले होते.या वेळी सुमारे 150 शेतकरी उपस्थित होते. पोलिसांनी 10 शेतक:यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली.
शिवसेनेचे अनोखे आंदोलन
शहरात राष्ट्रीयकृत, खासगी बॅँकाचे एटीएम आहेत. मात्र यातील बहुतांश एटीएम मशीन बंदच असतात. याविरुद्ध शिवसेनेने आज अनोखे आंदोलन केले. सकाळी 11 वाजता शहरातील सेंट्रल बॅँक, देना बॅँक, युनियन बॅँक, अॅक्सिस बॅँकेच्या बंद असलेल्या एटीएमला पुष्पहार घातला.
त्यानंतर संबंधित बॅँकेच्या व्यवस्थापकांना फुलहार देऊन गांधीगिरी करीत एटीएम मशीन तत्काळ सुरू करण्याची विनंती करण्यात आली. अन्यथा शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या वेळी सेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख अनिल अंबर पाटील, शहरप्रमुख प्रताप शिंपी, विजय पाटील, संजय कौतीक पाटील, डॉ शशिकांत सोनार, जितेंद्र झाबक, दीपक बोरसे, जीवन पवार, सूरजसिंग परदेशी, चंद्रशेखर भावसार, मोहन भोई, संजय भिल, देवेंद्र देशमुख, रवींद्र पाटील, संजय पवार, अक्तर तेली, सुनील पाटील, बारकू पाटील आदी उपस्थित होते.
चोपडा
शेतक:यांचा सातबारा कोरा करावा, वीज बिल माफ करावे, शेतमालाच्या आधारभूत किमतींमध्ये वाढ करावी, आदी मागण्यांसाठी गुरुवारपासून शेतकरी संपावर गेले आहेत. या शासनाचा निषेध करण्यासाठी किसान क्रांती शेतकरी कृती समितीतर्फे आज सकाळी चोपडा-यावल रस्त्यावर पंकजनगर स्टॉपजवळ रास्ता रोको केले. जवळपास तासभर केलेल्या रास्ता रोकोमुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. शेतक:यांच्या संपाला प्रतिसाद म्हणून चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती. काही शेतक:यांनी शहरातील गरजू नागरिकांना शेतमाल विकला तर काहींनी माल परत घरी नेला. रास्ता रोकोवेळी संजीव बाविस्कर, भागवत महाजन, धनंजय पाटील, मेहमूद बागवान, मधुकर विठ्ठल बाविस्कर, अजित पाटील, नारायण पाटील, जगदीश पाटील, समाधान पाटील, गुलाबराव पाटील, साठे, प्रकाश पाटील, रमेश हिम्मतराव सोनवणे, अनिल पाटील, विनायक यशवंत सोनावणे, जगन पाटील, दत्तात्रय पाटील यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. याप्रकरणी 14 जणांना अटक करून नंतर त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर चोपडा-शिरपूर रस्त्यावरील गलंगी येथेही रास्ता रोको आंदोलन झाले.
अमळनेर : आपल्या विविध मागण्यांसाठी शेतकरी गुरुवारपासून संपावर गेले आहेत. मात्र या संपाचा अमळनेरात पहिल्या दिवशी कुठलाही परिणाम जाणवला नाही. भाजीबाजारात स्थानिक भाजीपाला विक्रेत्यांसह परराज्यातील भाजी विक्रेतेही आले होते.
भाजीपाला बाजारात स्थानिक शेतक:यांसोबत परराज्यातील भाज्यादेखील विक्रीस आल्या होत्या. मात्र रोजच्या आवकपेक्षा आजची आवक कमी असल्याचे आडत व्यापारी भाईदास महाजन यांनी सांगितले.