गीतरामायण हे जीवनात धैर्य निर्माण करणारे - कवी आनंद माडगूळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 10:30 PM2020-03-15T22:30:03+5:302020-03-15T22:30:26+5:30
‘गदिमां’ची प्रतिमा रसिकांच्या मनात ठासून
जळगाव : गदिमा लिखित गीतरामायण हे मानवी जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर उपाय शोधणारे तसेच संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य निर्माण करणारे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग.दि. माडगूळकर यांचे चिरंजीव कवी व गायक आनंद माडगूळकर यांनी केले.
रविवारी सायंकाळी शहरात आयोजित अग्निहोत्र कार्यक्रमासाठी ते शहरात आले होते. कार्यक्रमानंतर ‘लोकमत’ ने त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी झालेला हा प्रश्नोत्तररुपी संवाद
प्रश्न : गीतरामायणाच्या प्रयोगांना कधी सुरुवात केलीत?
उत्तर : गदिमांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार प्रयोग सादर केले आहेत.
प्रश्न : आताच्या तरुण पिढीने गदिमांना पाहिले नाही. मात्र ते आपल्या कार्याच्या रूपाने त्यांना अनुभवतात, काय सांगाल ?
उत्तर : गदिमांनी श्रीरामांचे जीवन गीतरामायणाच्या माध्यमातून तळागाळातल्या माणसापर्यंत पोहचविले. म्हणूच त्यांची प्रतिमा मराठी रसिकांच्या मनात आजही ठासून भरलेली आहे. गदिमांचे कार्य तरुणांना आदर्श घेण्यासारखे निश्चित आहे.
प्रश्न : पुण्यात गदिमांचे स्मारक उभारण्याबाबत ठोस भूमिका घेतली जात नाही, याबाबत आपले मत काय?
उत्तर : कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आले, तरीदेखील याबाबतचा निर्णय प्रलंबित राहत आहे. केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वासने दिली जातात. याची खंत वाटते. हा निर्णय लवकर व्हावा. याबरोबरच अवघ्या महाराष्ट्रातील रसिकांच्या मनात गदिमांचा जागा कायम आहे. केवळ स्मारकापुरते ते मर्यादित अथवा संकुचित नाहीत, हेही आवर्जून सांगावेसे वाटते.
प्रश्न : सामान्य माणसासाठी गदिमांना सोप्या भाषेत कसे समजवाल?
उत्तर : गदिमा म्हणजे देशभरातील उन्नत अशा काव्यविचारांना एकत्र करून एक सर्वसामान्यांना पचेल व रुचेल असे काव्यरसायन. सामान्यांच्या भाषेत समजावणारा कवी. रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा मराठीतील वाल्मिकी. स्वत: ऋषितुल्य जीवन जगून समाजापुढे श्रीरामांचे आदर्श जीवन उलगडणारे अद्भुत असे रसायन म्हणजे गदिमा होत.
प्रश्न : गीतरामायणातून आजच्या तरुण पिढीने काय आदर्श घ्यावा?
उत्तर : गदिमांनी गीतरामायणातून श्रीरामांच्या अनेक गुणांचे वर्णन केले आहे. बाल्य, तरुण, प्रौढ, यौद्धा, कोमलहृदयी पण तितकाच कठोर अशी अनेकविध गुणदर्शने आहेत. आजच्या तरुणांनी प्रभू रामचंद्रांच्या आदर्श जीवनातला एक जरी गुण अंगीकारून सातत्याने त्याचे आचरण केले तरीदेखील तरुण नैराश्येतून मुक्त होतील, याची मला खात्री आहे.