गेंदालाल मिलचा 'डॉन' नागपूर कारागृहात स्थानबद्ध एनपीडीए ; चाळीसगाव, रावेरच्या गुन्हेगारावरही कारवाई
By सागर दुबे | Published: April 29, 2023 05:37 PM2023-04-29T17:37:18+5:302023-04-29T17:37:27+5:30
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव : शहरासह परिसरामध्ये दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार संदीप उर्फ डॉन मधुकर निकम (२८, रा.गेंदालाल मिल) याच्यावर 'एमपीडीए'ची कारवाई करून त्याला एका वर्षासाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
संदीप उर्फ डॉन यांच्याविरूध्द जळगाव शहरसह एमआयडीसी, रामानंदनगर पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल १० गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय ०१ अदखलपात्र गुन्हा दाखल असून ०४ प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्याचा स्थानबध्दतेचा प्रस्ताव जळगाव शहर पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी तयार करून स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला होता. त्याची पडताळणी करून स्थानिक गुन्हे शाखेने प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला होता. अखेर जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मंजूरी दिली असून शुक्रवारी डॉन याला सहाय्यक फौजदार संजय भांडारकर, दीपक पाटील, मनोज पाटील, तेजस मराठे, संगिता इंगळे अशांनी ताब्यात घेवून नागपूर कारागृहात स्थानबध्द केले आहे.
या गुन्हेगारांवरही कारवाई
वाजिद खान साबीर खान (२३,रा.नागदरोड, चाळीसगाव) याला सुध्दा एपीडीएतंर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द केले असून त्याच्याविरूध्द चाळीसगाव शहर पोलिसात ५ गुन्हे दाखल असून ३ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहे. रावेर येथील गुन्हेगार शेख शहारूख शेख हसन (२६) याला ठाणे मध्यवर्ती कारागृह याठिकाणी स्थानबध्द करण्यात आले आहे. त्याच्याविरूध्द रावेर पोलिसात ०५ गुन्हे दाखल असून ०१ अदखलपात्र गुन्हा देखील दाखल आहे. तर त्याच्याविरूध्द ०३ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत.
कारवाईचा सपाटा...
गुन्हेगारी संपविण्यासाठी जळगाव पोलिस दलाने गुन्हेगारांवर कारवाईचा सपाटाच लावला आहे. शुक्रवारी एकाच दिवसात तीन गुन्हेगारांवर एनपीडीएतंर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे धाबे दणाणून गेले आहे.