रेकॉर्डब्रेक विषयांच्या प्रस्तावांची आज महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:22 AM2021-02-26T04:22:27+5:302021-02-26T04:22:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत एकाच महासभेत सर्वाधिक विषय असलेल्या महासभेचे आयोजन शुक्रवारी सकाळी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाची स्थापना झाल्यानंतर आतापर्यंत एकाच महासभेत सर्वाधिक विषय असलेल्या महासभेचे आयोजन शुक्रवारी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. महापौरांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ १८ मार्च रोजी संपणार असून, भारती सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही महसभा अखेरची राहण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या दोन महासभांचे आयोजन करण्यात आले असून, महासभेच्या मंजुरीसाठी तब्बल ८५ विषय अजेंड्यावर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील वाढीव भागासाठी अमृत अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी ३० कोटींच्या निधीला मंजुरीचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे.
महासभेत एकूण ८५ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले असून, यामध्ये शिवाजी उद्यानातील जे.के.डेव्हलपर्सला भाडे तत्वावर दिलेली जागा ताब्यात घेण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. यासह पिंप्राळा भागातील जागा भूसंपादित करण्याचा, अग्निशमन अत्याधुनिक साहित्य व उपकरणे खरेदीबाबतचा जिल्हा नियोजन विभागाला ४९ लाख रुपयांचा प्रस्तावसह, महापौर, उपमहापौर व मनपा विरोधी पक्ष नेत्यांसाठी मनपा फंडातून वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवला जाणार आहे. यासह राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या ४२ कोटींच्या निधीबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याबाबत व दाद मागण्यासाठीचे अधिकार सभागृहातील सदस्यांना प्रदान करण्याबाबत ॲड.शुचिता हाडा यांनी प्रस्ताव सादर केला आहे.
रस्त्यांसाठी ७० कोटींचा प्रस्ताव
सप्टेंबर महिन्यात ४५ कोटींच्या मनपा फंडातून शहरातील रस्त्यांच्या होणाऱ्या कामाचे अंदाजपत्रक रद्द करून, आता नव्याने २५ कोटींची भर टाकून ७० कोटींच्या कामांचे नवीन अंदाजपत्रक आता तयार केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील महासभेत ठेवण्यात आला आहे. यासह शहरातील विविध विकासकामांबाबतचा प्रस्ताव देखील महासभेत ठेवण्यात आले आहे.
गाळ्यांचा थांबविलेल्या प्रस्तावावर होणार गोंधळ
मनपा प्रशासनाने मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्न निकाली काढण्याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यासाठी दिला होता. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव थांबविला आहे. त्यामुळे या विषयावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरले जाण्याची शक्यता आहे. यासह शिवसेनेककडून महापौरांचा जाहीर सत्कार देखील केला जाणार आहे.