भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 10:34 PM2018-05-03T22:34:19+5:302018-05-03T22:34:19+5:30

भुसावळ शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवरुन गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला.

The general meeting of the municipality of Bhusawal | भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

भुसावळ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ

googlenewsNext
ठळक मुद्देगोंधळातच ४१ विषयांना मंजुरीसर्वसाधारणसभा ठरते केवळ औपचारिकतासर्वसाधारण सभेत सत्ताधारी-विरोधक भिडले

आॅनलाईन लोकमत
भुसावळ, दि.३ : शहरातील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवरुन गुरुवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला.अजेंड्यावरील ४१ विषयांना गोंधळाच्या वातावरणातच मंजुरी देण्यात आली. दरम्यान, दरवेळी होणारी पालिकेची सर्वसाधारण सभा आता केवळ औपचारिकता म्हणून होत आहे. त्यात शहराचा विकास आणि शहरवासीयांच्या कोणत्याही प्रश्नांवर चर्चाच होत नसल्याची भावना शहरवासीयांमध्ये पसरली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होते. सोबत व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर होते. प्रारंभी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना भोसरी प्रकरणात क्लीनचिट मिळाल्याने अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. अकरा वाजता होणारी सभा सव्वा अकरा वाजता सुरू झाली. सभेला सुरुवात होताच जनाधार विकासपार्टीतर्फे नगराध्यक्ष रमण भोळे यांना समस्यांबाबतचे निवेदन देण्यात आले.
सत्ताधारी-विरोधक भिडले
गुरुवारी ३ रोजीच्या सर्वसाधारण सभेत सभेत शहर विकासच्या ४१ विषयांवर चर्चा करण्यात येणार होती, परंतु आधी शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा करा यावरून सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुंपली. शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाला असताना कोणत्या भागात किती पाणी सोडले जाते. पिण्याच्या पाण्याचे नियोजन काय? किती टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येतो? कोणत्या प्रभागात पाणी सोडण्यात येते अशा अनेक प्रश्नांचा भडीमार जनाधारचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी केला. यावर उत्तर देताना नगराध्यक्ष भोळे यांनी सांगितले की, पालिकेत एक वर्षापूर्वी एकही टँकर वापरायोग्य नव्हते. आता तीन टँकरद्वारा आवश्यकते नुसार पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पैकी एक टँकर दुर्गेश ठाकूर यांच्याच प्रभागात २४ तास पाणीपुरवठा करीत असल्याचेही भोळे यांनी सांगितले.
हमरी-तुमरी अन् वाद
सभेच्या अजेंड्यावरील विषयांवर चर्चा न करता मधूनच हमरी-तुमरी वादाला सुरुवात झाली.
नगरसेविकांमध्येही वाद
सभेत नेहमी नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक होत होती, परंतु गुरुवारच्या सभेत नगरसेविकांमध्येही जोरदार शाब्दिक चकमक झाली. नगरसेवकांच्या मध्यस्थीने वाद मिटविण्यात आला.

Web Title: The general meeting of the municipality of Bhusawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.