सहा महिन्यात जळगाव शहरामध्ये जेनेरिक औषधींचे होलसेल केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 05:15 PM2017-11-26T17:15:52+5:302017-11-26T17:16:27+5:30
तीन वर्षात सोळा दुकाने सुरू
विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 26 - दिवसेंदिवस वाढत जाणा:या ब्रॅण्डेड औषधींच्या किंमतीच्या तुलनेत जेनेरिक औषधी स्वस्त आणि तितकीच परिणामकारक ठरत असल्याने या औषधीला दिवसेंदिवस पसंती वाढत आहे. त्यामुळे जेनेरिक औषधींच्या दुकानांवर गर्दी वाढून तीनच वर्षात सोळा दुकाने सुरू झाली आहेत. शहरात हा वाढता प्रतिसाद पाहता येत्या सहा महिन्यात शहरातच जेनेरिक औषधीचे होलसेल दुकान सुरू होणार आहे.
जेनेरिक सलाईनची किंमत 15 टक्केच
ब्रॅण्डेड औषधांच्या किंमती दिवसेंदिवस गगणाला भिडत आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना उपचार घेणे म्हणजे मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. यावर जेनेरिक औषधी एक उत्तम पर्याय ठरत असून त्याला चांगलीच मागणी वाढली आहे. जेनेरिक औषधी इतर औषधींच्या तुलनेत 30 ते 60 टक्क्याने स्वस्त आहे. तसेच ब्रॅण्डेड सलाईनच्या तुलनेत जेनेरिक सलाईनची किंमत 15 टक्केच आहे. त्यामुळे स्वस्तात या औषधी मिळत असल्याने त्यांना मोठी मागणी वाढली आहे.
तीन वर्षात 16 दुकाने
इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जेनेरिक समितीच्यावतीने आणि विद्यार्थी सहायक समितीमार्फत शहरात जेनेरिक औषधींच्या दुकानांची सुरुवात झाली. सुरुवातीला एक एक दुकान असलेल्या या दोन्ही संस्थांच्या केंद्रांवर मागणी वाढत गेल्याने संस्थांनी त्यांची केंद्रही वाढविली. सध्या इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या जेनेरिक समितीचे 10 केंद्र सुरू आहे तर विद्यार्थी सहायक समितीचे सहा केंद्र सुरू आहेत.
उलाढालही वाढली
स्वस्तात औषधी मिळत असल्याने नागरिकांचा कल इकडे वाढू लागल्याने या केंद्रांवर गर्दी होत आहे. त्यामुळे त्यांची उलाढालही मोठय़ा प्रमाणात वाढून एकेका संस्थेची महिन्याकाठी 9 ते 10 लाखाची उलाढाल होत आहे. एवढीच ब्रॅण्डेड औषधी 50 ते 60 लाखार्पयत जाऊ शकते. त्यामुळे जेनेरिकचा वाढता वापर यावरूनच लक्षात येतो.
सहा महिन्यात होणार होलसेल उपलब्ध
जेनेरिक औषधीला प्रतिसाद मिळत असल्याने संस्थांनी एक एक करीत केंद्र वाढविले. इंडियन रेडक्रॉस सोसायटीची 10 केंद्र झाल्याने आता मागणी वाढत असली तरी केंद्र वाढवून ते संभाळणे अवाक्याबाहेर होईल, या विचाराने केंद्र वाढविण्यापेक्षा होलसेल दुकानच सुरू करणे सोयीचे ठरेल असे ठरविले आहे. त्यामुळे जळगावात येत्या सहा महिन्यात रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने जेनेरिक औषधी होलसेल उपलब्ध करून दिली जाणार आहे. रेडक्रॉस सोसायटीच्या इमारतीचे काम सुरू असल्याने ते पूर्ण होताच त्या ठिकाणी हे दुकान सुरू होणार असल्याचेसांगण्यातआले.
नशिराबाद येथेही केंद्र
जेनेरिक औषधीच्या खरेदीसाठी जळगाव शहरासह परिसरातील व जिल्ह्यातील नागरिकांचाही प्रतिसाद मिळत असल्याने विद्यार्थी सहायक समितीच्यावतीने येत्या 15 दिवसात जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथेही जेनेरिक औषधी विक्रीचे केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
जेनेरिक औषधीला वाढती मागणी असून समितीच्या वतीने 10 केंद्र सुरू आहेत. प्रतिसाद वाढत असल्याने सोयीसाठी शहरातच होलसेल दुकान सुरू करण्यात येणार आहे.
- शेखर सोनाळकर, अध्यक्ष, जेनेरिक समिती, इंडियन रेडक्रॉस सोसायटी.
जेनेरिक औषधीला मागणी वाढत असून हळूहळू शहरात सहा केंद्र सुरू झाली आहेत. आता सातवे केंद्र येत्या 15 दिवसात नशिराबाद येथे सुरू करण्यात येणार आहे.
- प्राचार्य एस.एस. राणे, विद्यार्थी सहायक समिती