मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:20 PM2019-04-08T22:20:49+5:302019-04-08T22:23:50+5:30
नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
मुक्ताईनगर/ रावेर: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यातील अनेक गावांना ८ रोजी सायंकाळी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
मुक्ताईनगर तालुक्यातील २५ गावांना भूकंपाचा धक्का
मुक्ताईनगर तालुक्यातील तापी पूर्णा खोऱ्यात तब्बल २५ गावांना सोमवारी सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. अधिकतर गावे तापी नदी काठावरची असून २ सेकंदाचा हा धक्का होता.घराच्या भीती थरारल्या छताचे पंखे हालले अचानक च्या या प्रकारामुळे नागरिकां मध्ये भीती पसरली आणि लोक घराबाहेर पडले, प्रत्येक गावात पारावर गर्दी जमली होती. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्त हानी नाही. दरम्यान काही गावांमध्ये गूढ आवाज आल्याचे ही सांगण्यात आले परंतु या बाबत खात्री नाही. दुसरीकडे महसूल प्रशासन देखील संभ्रमात आहे. तहसीलदार श्याम वाडकर यांनी सांगितले की मला ही भूकंपा बाबत फोन आले आहेत जिल्ह्यावरून या बाबत माहिती घेत आहे. मेळसांगावे, मोंढळडे, मुंढोलदे, उचंदे, शेमळदे,पूरनाड, नायगाव करकी, कोठे, पंचाने, बेलसवडी, अंतुर्ली, नरवेल,भोकरी, धामनदे,बेलखेड, लोहरखेडा, पिंप्रीनांदू, पिंप्री पंचम, धाबे, पतोंडी या गावांमध्ये भूकंपा चा धक्का जाणवला.
रावेर तालुकाही हादरला
रावेर शहरासह तालूक्यातील सातपुड्याच्या पर्वतरांगांच्या पायथ्यापासून ते तापी काठावरील उत्तर - पुर्व - दक्षिण भागात ८ रोजी रात्री ७:३७ वाजेच्या रहिवाशांना सुमारे तीन - चार सेकंद भूकंपाचा सौम्य धक्का बसला. हतनूर सिंचन प्रकल्पावरील भूकंपमापक यंत्र तांत्रिक बिघाडामुळे नादुरुस्त अवस्थेत असल्याने अधिकृत माहिती प्राप्त झाली नसून संबंधित यंत्रणेकडून माहिती अवगत करीत असल्याचे फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी स्पष्ट केले.
दरम्यान दुपारी तीन वाजेच्या सुमारास आकाशात मेघ दाटून आल्याने अकाली पावसाच्या तुरळक सरी काही मिनीटे कोसळल्यानंतर पुन्हा उन्हाची तिरीप निघून ढगाळ वातावरणात सुर्यास्त झाला. तथापि, रावेर शहरासह भोकरी, केºहाळे बु, वाघोड, मोरगाव, खानापूर, चोरवड, अजनाड, अटवाडे, दोधे, नेहता, निरूळ, पाडळे, अहिरवाडी, कर्जोद, रसलपूर, विटवा, ऐनपूर, निंबोल, तांदलवाडी आदी भागांत रात्री ७:३७ वाजेच्या सुमारास विहीर खोदकामाच्या ब्लास्टींगप्रमाणे धमाकेदार आवाज येवून सुमारे तीन ते चार सेकंद भुकंपाचा सौम्य धक्का बसला.