‘अजिंठ्या’चा लाभ हॉटेल व्यवसायाला मिळावा - जळगावातील हॉटेल व्यावसायिकांची अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:15 PM2019-05-31T12:15:27+5:302019-05-31T12:18:39+5:30
पर्यटन, विमानतळ व रेल्वे विभागाने पुढाकार घेण्याची एकमुखी मागणी
जळगाव : जागतिक वारसास्थळ असलेल्या अजिंठा लेणीविषयीची माहिती जळगाव रेल्वे स्थानकावर उपलब्ध करून देण्यासह पर्यटनाच्यादृष्टीने शहरात सुविधा उपलब्ध करून दिल्या व दळणवळणाची पुरेशी सोय झाल्यास हॉटेल व्यवसायात मोठी भरभराट येईल, असा विश्वास शहर व परिसरातील हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केला. या सोबतच हॉटेलच्या वेळेबाबत निश्चित धोरण ठरविणे, हॉटेलमध्ये येणाऱ्यांच्या ओळखपत्राविषयी सुटसुटीत नियम करण्यासंदर्भात उपाययोजना करणेही गरजेचे आहे, असा सूरदेखील या वेळी व्यावसायिकांकडून उमटला.
‘लोकमत’च्यावतीने गुरुवारी शहर कार्यालयात हॉटेल व्यावसायिकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये हॉटेल व्यावसायिकांना येणाºया अडीअडचणी, त्यांचे विविध प्रश्न, व्यवसाय वृद्धीसाठी काय केले जावे, या विषयी सविस्तर चर्चा झाली.
चर्चासत्रास हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष लेखराज उपाध्याय, भागवत भंगाळे, प्रदीप अहुजा, भगत बालाणी, अशोक जोशी, जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील, लक्ष्मीनारायण उपाध्याय, महेश व्यास, सुमीत सोनवणे, निर्मल अरोरा, अमोल साळी, मनोज महाजन, विजय चौधरी, प्रदीप जाधव, संदीप ढंडोरे, गोपाल चव्हाण, विजय पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी ‘लोकमत’चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी, सहायक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
अजिंठा लेणीचा फलक असावा
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी हे पर्यटन स्थळ जळगावपासून अवघ्या ५५ कि.मी. अंतरावर असल्याने त्याचा फायदा घेणे गरजेचे असल्याचे या वेळी हॉटेल व्यावसायिक म्हणाले. तसे पाहता ४० वर्षांपूर्वी पर्यटक मार्गदर्शन कार्यालय (टुरीस्ट आॅफिस) जळगावात होते. तसेच जळगाव रेल्वे स्थानकावर अजिंठा लेणीला जाण्यासाठी या स्थानकावर उतरण्याविषयीचे फलकदेखील होते. मात्र आता हे काहीच नसल्याने पर्यटक जळगावकडे फिरकत नसल्याचा मुद्दा या वेळी मांडण्यात आला. इतकेच नव्हे तर इंटरनेटवरदेखील माहिती शोधताना जळगावपासून अजिंठा लेणी जवळ आहे, याविषयी कोठेच उल्लेख नाही. त्यामुळे देशी-विदेशी पर्यटक इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार लेणीपर्यंत पोहचतात. त्यामुळे या पर्यटन स्थळाच्या इतक्या जवळ असूनदेखील जळगावला कोणताही लाभ मिळत नसल्याचे वास्तव आहे. यामध्ये पाचोरा रेल्वे स्थानकावर अजिंठा लेणीला जाण्याविषयीचा फलक लावण्यात आला आहे. मात्र तेथे उतरल्यास पाचोºयात खाद्य असो की इतर कोणत्याही सुविधा पर्यटकांना मिळत नाही व वाहनांचीदेखील सोय नसल्याने पर्यटकांचे हाल होता. या सर्वांचा विचार केला आणि जळगावात पर्यटक येण्यासाठी प्रयत्न झाले तर ते पर्यटकांनाही सोयीचे होऊन येथील व्यवसाय वाढीसही चालना मिळेल, असा सूर यावेळी उमटला.
विमानसेवेमुळे पर्यटक वाढतील
जळगावात नियमित विमानसेवा सुरू केल्यास विदेशी पर्यटकांसाठी ते सोयीचे होऊन मुंबईसह देशातील ठिकठिकाणच्या पर्यटनस्थळावरून पर्यटक अजिंठा लेणीत जाण्यासाठी जळगावात येतील व त्यामुळे येथील हॉटेल व्यवसाय वाढीस चालना मिळेल, असेही या वेळी सुचविण्यात आले.
धार्मिक, पर्यटनस्थळांचा विकास व्हावा
औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या पर्यटनस्थळांमुळे पर्यटक औरंगाबादला येऊन तेथून अजिंठा लेणीत जातात. त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील मनूदेवी, पद्मालय व इतर धार्मिक तसेच पर्यटन स्थळांचा विकास केल्यास येथे पर्यटकांचा ओघ वाढू शकेल, त्यासाठी या स्थळांचा विकास व्हावा, अशी मागणी करण्यात आली.
बंदची निश्चित वेळ ठरवा
हॉटेल बंद करण्यासंदर्भात रात्री ११ वाजेची वेळ ठरविण्यात आली आहे. मात्र ही वेळ ग्राहकांना हॉटेलमध्ये प्रवेश देण्याची आहे की, हॉटेल बंद करण्याची आहे, या बाबत संभ्रम आहे. त्यामुळे ११ वाजता ग्राहकांना जेवणासाठी हॉटेलमध्ये प्रवेश दिल्यास ते जेवण करीत असताना बंद करण्याबाबत पोलिसांकडून आग्रह होऊ नये, अशी मागणी या वेळी करण्यात आली. अनेक जण रात्री वेळ झाल्यास जेवायला आले तर त्यांच्या सोयीसाठी रात्री १२ वाजता हॉटेल बंद करण्यात याव्या, अशीही मागणी केली.
काही हॉटेलना मुभा असावी
प्रवासी रात्री रेल्वे अथवा इतर वाहनांनी शहरात आले तर त्यांना जेवण मिळावे, यासाठी शहरात काही ठिकाणी रात्री हॉटेल सुरू ठेवल्यास प्रवाशांंसाठी ती मोठी सोय होईल, असेही या वेळी सूचविण्यात आले.
ओळखपत्राबाबत दबावतंत्र नसावे
हॉटेल, लॉजवर पती-पत्नी आले तर त्यांच्यापैकी पत्नीच्या ओळखपत्रात माहेरचे नाव असल्यास त्यावरून व्यावसायिकांना पोलिसांकडून विचारणा केली जाते. या सोबतच हॉटेलमध्ये येणारे जोडपे प्रौढ (अॅडल्ट) असल्यास त्यांच्याबाबत हॉटेल व्यावसायिकांवर दबावतंत्र आणणे, त्यांच्या खोलीमध्ये जाऊन विचारणा करणे हे प्रकार चुकीचे असून त्याला आळा बसावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. एकीकडे सर्वोच्च न्यायालय ‘लिव्ह ईन रिलेशनशीप’ची परवानगी देते आणि पोलीस हॉटेलमध्ये येणाºया प्रौढ जोडप्यांबाबत वेठीस धरते, हा पोलिसांचा कुठला न्याय आहे, असा सवालही या वेळी उपस्थित करण्यात आला. इतकेच नव्हे तर ओळखपत्राच्या प्रती वर्षभर सांभाळणेही कठीण असल्याने ही मर्यादा कमी करण्याची मागणी करण्यात आली. किंवा संगणकीकृत नोंदींना प्रमाण मानावे.
ट्रॅव्हल्सच्या प्रवाशांना त्रास
शहरात ट्रॅव्हल्सने येणाºया प्रवाशांना शहराबाहेर सोडल्याने त्यांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी या प्रवाशांना रेल्वेस्थानक परिसरात अथवा शहरात आणून सोडले तर हॉटेल व्यवसाय वाढीस चांगला वाव असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. या सर्व प्रश्नांबाबत ‘लोकमत’ पाठपुरावा करणार असून पर्यटन वाढीसाठीही पुढाकार घेईल, अशी ग्वाही या वेळी मिलिंद कुलकर्णी यांनी दिली. वितरण विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेश सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.