आता घरातून काढा लर्निंग लायसन्स!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:11 AM2021-06-11T04:11:53+5:302021-06-11T04:11:53+5:30
आरटीओ विभागाचा निर्णय : चाचणी द्यावी लागणार ऑनलाइन जळगाव : लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरी ...
आरटीओ विभागाचा निर्णय : चाचणी द्यावी लागणार ऑनलाइन
जळगाव : लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. घरी बसून ऑनलाइन परीक्षा देता येणार असून लायसन्सची प्रिंटदेखील ऑनलाइन काढता येणार आहे. आरटीओ विभागाने याबाबतचा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून केली जाणार आहे. यासोबतच वाहन वितरकांच्या स्तरावरच वाहन क्रमांक जारी केला जाणार आहे.
केंद्र शासनाने एका अधिसूचनेद्वारे आधार क्रमांकाचा वापर करून फेसलेस सेवेचा लाभ घेण्याची तरतूद केली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रीय सूचना केंद्र यांनी वाहन व सारथी ४.० प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केलेले आहेत. ऑनलाइन लर्निंग लायसनची प्रक्रिया करताना अर्जदाराला रस्ता सुरक्षा विषयक व्हिडिओची पाहणी करावी लागणार आहे, त्यानंतर यात विचारलेल्या प्रश्नांची ६० टक्के अचूक उत्तरे दिल्यास चाचणी उत्तीर्ण होऊन त्या व्यक्तीला घरबसल्या लायसन्सची प्रिंट मिळणार आहे. त्याचप्रमाणे नमुना एक (अ) मेडिकल सर्टिफिकेटसुद्धा डॉक्टरांमार्फत ऑनलाइन पद्धतीने देण्याची सुविधा राष्ट्रीय सूचना केंद्र मार्फत विकसित करण्यात आली असून, याद्वारे अर्जदारांची तपासणी संबंधित डॉक्टरमार्फत करण्यात येणार आहे. नमुना एक (अ) अपलोड करण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक डॉक्टरने संबंधित परिवहन संकेतस्थळामार्फत अर्ज करायचे आहेत. त्यांची कागदपत्रांची पडताळणी करून परिवहन कार्यालयामार्फत युजर आयडी दिला जाणार आहे.
दरम्यान, बुलेट दुचाकी व कार या नवीन वाहनांच्या प्रथम नोंदणीच्या वेळी मोटार वाहन निरीक्षकांमार्फत मोटार वाहन तपासणीसाठी प्रत्यक्ष सादर करण्याची आवश्यकता नाही. नवीन नोंदणीच्या ऑनलाइन सोबत नमुना २०, नमुना २१, नमुना २२, डिस्क्लेमर, वाहन आणि चॅसिस क्रमांकाचा फोटो, वाहनाचा फोटो, पॅन कार्ड, सातबारा उतारा, शेती कामाचा ट्रॅक्टर यासंबंधीची कागदपत्रे वाहन वितरकाने पीडीएफमध्ये अपलोड करायची आहेत. त्यासाठी ई-स्वाक्षरीचा वापर करावयाचा आहे. कार्यालय प्रमुख अर्थात आरटीओ त्यास मान्यता देईल.
(बॉक्स)
असा करा ऑनलाइन अर्ज
या सेवेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने ‘परिवहन’ या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना आधार क्रमांकाची नोंद करणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव, पत्ता, स्वाक्षरी आधार डेटाबेसमधून परिवहन या संकेतस्थळावर येईल. यामुळे अर्जदाराची ओळखीची व पत्त्याची वेगळी खातरजमा करण्याची आवश्यकता भासणार नाही. शाळा सोडण्याचा दाखला व आवश्यक कागदपत्रे त्यावर अपलोड करावी लागणार आहेत.
(बॉक्स)
...तर जावे लागेल आरटीओ कार्यालयात
ज्यांच्याकडे आधार नाही किंवा ऑनलाइन परीक्षा द्यायची नाही अशांना कार्यालयात जावे लागेल. अशा अर्जदारांना पूर्वीप्रमाणेच ‘परिवहन’ या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करावा लागणार असून, कागदपत्रे अपलोड करणे, शुल्क भरणा व स्लाॅट बुकिंग करून कार्यालयांमध्ये लर्निंग लायसन्सची चाचणी देता येऊ शकते.
(बॉक्स)
नवीन वाहनाची प्रथम नोंदणी वितरकांकडूनच
आता नवीन वाहनांची नोंदणी करण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांमार्फत वाहन तपासण्याची गरज राहणार नाही. विक्रेत्यांकडून वाहन नोंदणी क्रमांक जारी होणार आहेत. पसंती क्रमांकासाठी नियम ५४ प्रमाणे कारवाई करण्यात येईल. वाहन अधिकृत विक्रेत्याने शुल्क व कर भरल्यानंतर नोंदणी क्रमांक हा जारी होणार आहे. त्यासाठी वाहन वितरक सर्व कागदपत्रे डिजिटल सहीचा वापर करून ही स्वाक्षरी करणार आहेत. नोंदणीकरिता आता वाहन किंवा कागदपत्रे आरटीओ कार्यालयात सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे वितरक व नागरिक यांची वेळ व खर्चाची बचत होणार आहे.
कोट...
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार परिवहन आयुक्त यांचे परिपत्रक कालच प्राप्त झाले. आधार क्रमांकावर आधारित ही सेवा सुरू केली जाणार आहे. घरबसल्या ऑनलाइन चाचणी देणे प्रत्येकाला शक्य होणार आहे. फक्त लर्निंग लायसन्ससाठीच ही सुविधा आहे. पुढील आठवड्यापासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी