रखडलेले पगार त्वरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:16 AM2021-04-22T04:16:13+5:302021-04-22T04:16:13+5:30
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने होत आहेत. गुढी ...
जळगाव : गेल्या दोन महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणामुळे राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार उशिराने होत आहेत. गुढी पाडवा सण गेला, श्रीराम नवमीदेखील गेली आणि आता रमजानचा पवित्र महिनाही सुरु झालेला आहे. महिन्याची २० तारीख उलटून गेली तरी शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षकांचे रखडलेले पगार त्वरित करण्यात यावेत, अशी मागणी शिक्षक भारतीच्यावतीने करण्यात आली आहे.
आमदार कपिल पाटील यांनी वित्त सचिवांना भेटून हा प्रकार समोर आणला होता. त्यानंतर हालचाली होऊन फेब्रुवारीचे पगार झाले. मात्र, काही जिल्ह्यात फेब्रुवारीचे पगार झालेले नाहीत. याचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. कोविड काळात अनेक ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतरांचे मृत्यू झालेले आहेत. अनेकजण कोविडग्रस्त असून, उपचारासाठी मोठा खर्च होत आहे. कर्जाचे हप्ते थकले आहेत. दंड, व्याज भरावे लागत आहे आणि या सगळ्या परिस्थितीत शिक्षण विभाग मूग गिळून बसलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पगार करावे, अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष नारायण वाघ, सोमनाथ पाटील यांनी केली आहे.