सार्वजनिक मंदिराच्या जागेवर खासगी प्लॉट देण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:13 AM2021-07-17T04:13:35+5:302021-07-17T04:13:35+5:30
केऱ्हाळे, ता. रावेर : तालुक्यातील अजनाड येथे पुनर्वसित गावठाण हद्दीत सार्वजनिक मंदिराच्या मालकीची जागा प्रशासनाच्या काही लोकांनी मिळून ...
केऱ्हाळे, ता. रावेर : तालुक्यातील अजनाड येथे पुनर्वसित गावठाण हद्दीत सार्वजनिक मंदिराच्या मालकीची जागा प्रशासनाच्या काही लोकांनी मिळून खाजगी लोकांना बेकायदेशीररीत्या देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी थेट जिल्हाधिकारी जळगाव यांना निवेदन देऊन याबाबत सखोल चौकशी करण्यासंदर्भात विनंती केली आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे प्रकल्पग्रस्त असलेल्या अजनाड गावाला पुनर्वसनासाठी स्वतंत्र गावठाण मंजूर करून प्रकल्पग्रस्त लाभार्थ्यांना प्लॉट वितरित केले आहेत, तसेच सहायक संचालक नगररचना कार्यालय यांनी बसवलेल्या नवीन गावठाण हद्दीमध्ये सार्वजनिक इमारती, मंदिर, शाळा, बसस्टँड, गुरचरण, स्मशानभूमी, खळवाडी, घनदाट झाडं लावण्यासाठी व भविष्यकालीन गाव वाढीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे नकाशात नमूद केले आहे. भविष्यात गाव वाढीसाठी दहा हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागा सोडण्यात आली आहे, तरीसुद्धा सार्वजनिक मंदिराकरिता सोडण्यात आलेल्या ५५८०.५० चौरस मीटर जागेवर बेकायदेशीर प्लॉट तयार करून पुनर्वसन विभागातील काही अधिकारी व कर्मचारी मिळून मर्जीतील लोकांना कोणाच्या दबावात किंवा कोणाच्या अधिकारात सदर बेकायदेशीर काम करीत असून, प्लॉट वितरित करून गावातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
मंदिर परिसरात सरकारी कर्मचारी व काही ग्रामस्थांनी मिळून सिमेंटच्या खुणा टाकल्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटल्याने चुकीच्या विषयी १२ जुलै रोजी थेट जळगाव जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांची भेट घेऊन घडला प्रकार सांगितला. यावेळी गेलेल्या ग्रामस्थांची तक्रार एकूण न घेता त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून प्रश्नांची सरबत्ती करीत आम्हाला पूर्ण अधिकार आहेत, आम्ही कुठेही व कोणालाही प्लॉट देऊ शकतो असे सांगण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदरप्रकरणी ग्रामस्थांना वेगळ्या प्रकारचा अनुभव आल्याने काहीतरी काळेबेरे असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात एक पाऊल पुढे जाऊन याबाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे दाद मागण्यासाठी १३ महिला व बाकी पुरुष अशा ४० ग्रामस्थांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
सार्वजनिक मंदिराच्या जागेवर बेकायदेशीर प्लॉट टाकून देणाऱ्या अधिकाऱ्यांना कोणी अधिकार दिला.
हा बेकायदेशीर प्रकार इथेच थांबला पाहिजे. अन्यथा गावात शांतता भंग झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील.
- संजय गंभीर पाटील
ग्रामस्थ, अजनाड, ता. रावेर
भविष्यकाळात गाववाढीसाठी जागेची तरतूद शासनाने केली असताना मंदिराच्या मालकीची सार्वजनिक जागा कोणालाही देण्यासाठी कायदा हातात घेऊन पुनर्वसन विभागाला अधिकार कोणी दिला?
-भास्कर गणपत पाटील
ग्रामस्थ, अजनाड, ता. रावेर
मंदिराच्या सार्वजनिक खुल्या जागेवर बेकायदेशीर सिमेंटच्या खुणा टाकलेल्या दिसत आहेत. (छाया : रमेश पाटील)